‘पीएफ, इसएसआयसी’ची कपात ‘अमृत’च्या खिशात
By Admin | Updated: January 2, 2017 01:01 IST2017-01-02T01:01:59+5:302017-01-02T01:01:59+5:30
सुरक्षा रक्षकांच्या मानधनातून कपात केलेली पीएफ आणि इएसआयसी’ची रक्कम ‘अमृत’ने स्वत:च्या खिशात ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘पीएफ, इसएसआयसी’ची कपात ‘अमृत’च्या खिशात
केवळ ५.३२ लाखांचा भरणा : महापालिकेत सावळागोंधळ
प्रदीप भाकरे अमरावती
सुरक्षा रक्षकांच्या मानधनातून कपात केलेली पीएफ आणि इएसआयसी’ची रक्कम ‘अमृत’ने स्वत:च्या खिशात ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. पीएफच्या नावे २४ लाख, तर इएसआयसीच्या नावे ५.४२ लाख रुपयांच्या रकमेवर 'अमृत'ने डल्ला मारला आहे. ही आकडेवारी केवळ फेब्रुवारी ते आॅगस्ट २०१६ दरम्यानचीच आहे. सप्टेंबर, आॅक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरची रक्कम यात जोडल्यास अमृतने या संपूर्ण व्यवहारात महापालिका आणि सुरक्षा रक्षकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमृतने फेब्रुवारीमध्ये १५० सुरक्षा रक्षकांची १ लाख ३० हजार ७७७, मार्च २०१६ मध्ये १५७ सुरक्षा रक्षकांची १,३०,७७७ इतकी रक्कम पीएफमध्ये भरणा केली. एप्रिल, मे, जून आणि जुलै या चार महिन्यांत ही रक्कम मानधनातून कपात करण्यात आली. मात्र खात्यात भरण्यात आली नाही. अहवालानुसार ९६ लाख ०७ हजार ३२६ रुपयांच्या एकूण अदा केलेल्या देयकाच्या तुलनेत अमृतने प्रतिसुरक्षा रक्षक २५.६१ टक्के इपीएफ भरणे अनिवार्य होते. प्रत्यक्षात २४ लाख ६० हजारांऐवजी केवळ तीन महिन्यांमध्ये ४.५० लाख भरणा करण्यात आला. करारनाम्यानुसार इपीएफची कपात २५.६१ टक्के असेल तर फेब्रुवारी, मार्च आणि आॅगस्टमध्ये ती रक्कम, सरासरी ९ ते १० टक्केच भरण्यात आली आहे. मानधनातून मात्र ही कपात न चुकता करण्यात आली. याशिवाय फेब्रुवारी ते आॅगस्टदरम्यान ९६.०७ लाखांचा तुलनेत ६.२४ लाख भरणे अनिवार्य असताना केवळ ८२०६७ रुपयेच भरण्यात आले आहेत.
ईपीएफसह इएसआयसी, आयकर आणि सेवाकरामध्ये आर्थिक सावळागोंधळ निर्माण झाला आहे. अमृतकडून भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततेचे इमले रचले जात असताना महापालिका प्रशासनाचे मौन संतापजनक आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे आहे. या अनियमितेची चौकशी अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविण्यात आली असून चौकशी अहवालाकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सुरक्षा रक्षकांच्या संख्येत तफावत
महापालिकेला १५४ सुरक्षा रषक पुरविण्याचा कंत्राट ‘अमृत’ला देण्यात आला. मात्र प्रत्येक महिन्यात सुरक्षा रक्षकांच्या संख्येत वाढ तथा घट दाखविण्यात आली आहे. उपस्थित अहवाल न दाखवता फेब्रुवारीत १५०, मार्चमध्ये १५७, एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येक १४७, जूनमध्ये १५२, जुलैत १७० तर आॅगस्टमध्ये तब्बल १७८ सुरक्षा रक्षक दाखविण्यात आले. अर्थात फेब्रुवारी ते आॅगस्ट या कालावधीत २८ सुरक्षा रक्षक वाढविण्याची गरज पालिकेला का पडली, याचे उत्तर प्रशासनाजवळ नाही.
टक्केवारीचा हिशेब
उपलब्ध नोंदीनुसार फेब्रुवारी ते आॅगस्ट या कालावधीत सुरक्षा रक्षकांची संख्या कमी - अधिक राहिली. १५४ सुरक्षा रक्षकांचा करारनामा असताना उर्वरित २४ सुरक्षारक्षक कुठे लावलेत, याचे उत्तर प्रशासनातर्फे येणे गरजेचे आहे. १५० प्रमाणेच १७८ सुरक्षा रक्षक कुठे कार्यरत आहेत याचा उपस्थिती अहवाल देण्यात आलेला नाही, टक्केवारीच्या हिशेबामुळे हा सर्व गोरखधंदा घडवून आणला गेला.