पेट्रोल-डिझेल दरवाढ कष्टकऱ्यांच्या मुळावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:12 IST2021-04-07T04:12:57+5:302021-04-07T04:12:57+5:30
अंजनगाव सुर्जी : पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा जबरदस्त फटका ...

पेट्रोल-डिझेल दरवाढ कष्टकऱ्यांच्या मुळावर!
अंजनगाव सुर्जी : पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा जबरदस्त फटका बसत आहे. एकीकडे वाहतूक खर्च वाढला असून, दुसरीकडे मात्र भाजीपाला, कांदे, बटाटे, फळे यांचे दर कमीच आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करीत आपला माल विकण्याची वेळ आली आहे. अमरावती येथील मार्केट यार्डात हवालदिल झालेले शेतकरी कमी भावात आपला माल विकून निराश होत घरी परत जात आहेत. अतिशय विदारक परिस्थिती राज्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. केंद्र सरकारने इंधनाच्या दरावरील नियंत्रण हटवल्यापासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत वाढ होत गेली आहे.
अनेक पिके शेतातच करपून जात आहेत. नगदी पीक म्हणून भाजीपाला, फळे, कांदे आदी पिके शेतकरी आपल्या शेतात घेत आहेत. योग्य भाव आल्यावर बाजारात याची विक्री करून कर्ज फेडून कुटुंबाचा गाडा चालवू, अशी अपेक्षा अनेक शेतकरी बाळगून आहेत. पण, अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. पण, एक नवी समस्या समोर आली आहे, ती म्हणजे मालवाहतुकीत झालेली भाडेवाढ. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडल्याने भाडेवाढदेखील मोठी झाली आहे. मात्र, यामध्ये शेतकरी भरडला जात आहे. कारण त्याच्या मालाच्या दरात कोणतीही भाववाढ झाली नाही. नगदी पीक घेण्याचा खर्च, वाहतुकीचा खर्च आणि मार्केट यार्डातील भाव या सर्व बाबींची बेरीज केली असता, शेतात पिकवलेला माल हा शेतातच राहिलेला बरा, असा विचार शेतकरी बांधव करू लागले आहेत. त्यामुळे ही नगदी पिके शेतात करपून जात आहेत.
वाढ रुपयांनी, घट पैशांत
पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात रुपयांत आणि कमी होतात पैशात. केंद्र सरकारने इंधनावरील नियंत्रण हटवल्याने पेट्रोल व डिझेलचे दर वाढतच गेले आहेत. ही दरवाढ रुपयांपासून सुरू होते आणि ज्यावेळी याचे दर कमी होतात, ते मात्र पैशात. यामुळे शेतकऱ्यांना आणखी आर्थिक चटके सहन करण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग अजूनच आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतमालाच्या वाहतूक खर्चाने त्यात आणखी भर टाकली. यामुळे शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे.