देशी कट्टा बाळगणाऱ्याला अटक
By Admin | Updated: March 4, 2017 00:13 IST2017-03-04T00:13:16+5:302017-03-04T00:13:16+5:30
कंबरेत देशी कट्टा लावून संशयित स्थितीत फिरणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री शासकीय विश्रामगृहाजवळ अटक केली.

देशी कट्टा बाळगणाऱ्याला अटक
तीन जिवंत काडतुसे जप्त : गुन्हे शाखेची कारवाई
अमरावती : कंबरेत देशी कट्टा लावून संशयित स्थितीत फिरणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री शासकीय विश्रामगृहाजवळ अटक केली. अब्दुल कासीब अब्दुल मोबीन (२४,रा. धर्मकाटा परिसर) असे आरोपीचे नाव असून त्याच्याजवळून तीन जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले आहे.
गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास विश्राम गृहासमोरील मार्गावर आरोपी संशयितरीत्या फिरत होता. या तरुणाजवळ देशी कट्टा असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अयुब शेख यांच्या पथकाने विश्राम गृहासमोरील मार्गावर सापळा रचून आरोपीला अटक केली. पोलिसांनी अब्दुल कासीबची झडती घेऊन त्याच्याजवळून देशी कट्ट्यांसह तीन जिवंत काडतूस जप्त केले. पोलिसांनी अब्दुलची कसून चौकशी केली असता त्याने तो देशी कट्टा ट्रान्सपोर्ट नगरातील एका सरदार ट्रक चालकाकडून १० हजारात विकत घेतल्याचे सांगितले. छंद म्हणून तो देशी कट्टा जवळ बाळगल्याचे आरोपीचे म्हणणे आहे. मात्र, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उद्देशाने आरोपी फिरत असल्याचा संशय पोलिसांना आला. (प्रतिनिधी)
आरोपी गांजाचा शौकीन
आरोपी अब्दुल कासीब हा अमंली पदार्थात मोडणाऱ्या गांजाचा शौकीन आहे. नियमितत गांजाची नशा करून तो गुन्हेगारीसाठी देशी कट्ट्याचा वापर करत असावा, असा संशय पोलिसांना आहे.
टवाळखोरांचा अड्डा
फे्रजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्किट हाऊस मार्ग व चपराशीपुरा परिसरात काही ठिकाणी टवाळखोरांचे अड्डे बनले आहे. त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेत अनेक तरुणांची गर्दी असते. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून यापैकी काही युवकांजवळ देशी कट्टे असल्याची दाट शक्यता आहे. अनेक युवक रिव्हॉल्वर समजून देशी कट्टा बाळगण्याचा छंद जोपासत असल्याची माहितीची चर्चा तरुणांमध्ये सुरु असते.