जिद्द बाळगा, असाध्य ध्येय साध्य होईल - उज्ज्वल निकम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 05:01 IST2020-12-30T05:00:00+5:302020-12-30T05:01:01+5:30
गुलशन कुमार हत्याकांड, प्रमोद महाजन हत्याकांड, १९९३ मुंबई बाॅम्बस्फोट खटला, खैरलांजी हत्याकांड, कोपर्डी बलात्कार व खून खटला अशा अनेक गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणांत गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देताना न्यायालयात कठोर असलेले उज्ज्वल निकम हे खासगी आयुष्यात आनंदी जीवन जगणारे सहज व्यक्ती आहेत. आयुष्य जगताना बाळगलेला व्यापक दृष्टिकोन, आंतरिक समाधान आणि स्वकर्तव्यावरील प्रेम (जाॅब सॅटिस्फॅक्शन) या बाबी आयुष्यात आनंदाचे खळाळते झरे निर्माण करीत असल्याचे गुपितही त्यांनी सांगितले.

जिद्द बाळगा, असाध्य ध्येय साध्य होईल - उज्ज्वल निकम
गणेश देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : काही तरी करून दाखवेलच, अशी जिद्द अंगी बाळगा. दृष्टी सकारात्मक ठेवा. आत्मविश्वास प्रज्वलित ठेवा. अशा मनोस्थितीतून यशाकडे झेपावणारे विचार आणि विचारांतून यशस्वी कर्तृत्व आकारास येते. अशा व्यक्तिमत्त्वाचा दरवळ सर्वत्र संचारतो.. प्रसिद्ध सरकारी वकील आणि यशस्वी व्यक्तिमत्त्व उज्ज्वल निकम यांनी यशाचे हे सरळसोपे सूत्र खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी उलगडले. खासगी कार्यक्रमानिमित्त अमरावती येथे आले असताना ‘लोकमत’च्या अमरावती युनिट कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
गुलशन कुमार हत्याकांड, प्रमोद महाजन हत्याकांड, १९९३ मुंबई बाॅम्बस्फोट खटला, खैरलांजी हत्याकांड, कोपर्डी बलात्कार व खून खटला अशा अनेक गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणांत गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देताना न्यायालयात कठोर असलेले उज्ज्वल निकम हे खासगी आयुष्यात आनंदी जीवन जगणारे सहज व्यक्ती आहेत. आयुष्य जगताना बाळगलेला व्यापक दृष्टिकोन, आंतरिक समाधान आणि स्वकर्तव्यावरील प्रेम (जाॅब सॅटिस्फॅक्शन) या बाबी आयुष्यात आनंदाचे खळाळते झरे निर्माण करीत असल्याचे गुपितही त्यांनी सांगितले.
अपेक्षेप्रमाणे जन्मत:च प्रत्येक गोष्ट मिळत नसली तरी; प्रयत्नाने हवे ते सर्व साध्य करता येते, हे मी अनुभवातून सांगू शकतो. मी इंग्रजी शाळेत गेलो नाही. जळगावात मराठी माध्यमातून माझे शिक्षण झाले. मला डाॅक्टर व्हायचे होते. बॅरिस्टर असलेल्या माझ्या वडिलांना मात्र मी वकील व्हावे, असे खूप वाटत होते. मी त्यांची इच्छा पूर्ण केली. वकील झालो. जळगावात जिल्हा सरकारी वकील या पदावर काम करीत असताना मुंबईच्या खटल्याची जबाबदारी माझ्यावर आली. जिल्हा वकील संघाने मला निराेप दिला. निरोप देताना माझी स्तुती केली. त्यावेळी भाषणातून कुणी म्हणाले, मुंबईत १२-१३ सरकारी वकील असतील, त्यात आता आपले उज्ज्वल निकम हेही एक असतील. निरोपाला उत्तर देताना त्या वाक्याचा धागा पकडून मी म्हणालो, मुंबईत कितीही वकील असले तरी उज्ज्वल निकम मात्र एकच असेल. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही कुठलेही यश संपादन करू शकता.
बायोपिक निघणार, अमिर खान साकारणार भूमिका
उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर बायोपिक निघतोय. अमिर खान त्यात मुख्य भूमिका साकरणार आहे. ‘ओएमजी’चे डायरेक्टर बायोपिक डायरेक्ट करेल. अमिरने नुकत्याच उज्ज्वल निकम यांच्याशी आठ तास गप्पा मारल्या. अद्याप बायोपिकचे निर्णायक स्वरूप निश्चित व्हावयाचे असले तरी त्यादृष्टीने पावले मात्र उचलली जात असल्याची माहिती निकम यांच्याशी मारलेल्या गप्पांदरम्यान मिळाली.
साखळी न्यायव्यवस्थेत चुकांची जबाबदारी कुणावरच निश्चित होत नाही. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात न्यायाविषयी शंका उत्पन्न होते. ‘१०० गुन्हेगार सुटले तरी चालेल, पण एकाही निर्दोषाला शिक्षा होऊ नये’, या तत्त्वावर न्यायव्यवस्था काम करते न्यायव्यवस्थेतील चुकांची जबाबदारी निश्चित होणे त्यामुळेच गरजेचे आहे.
प्रामाणिकपणा उत्तम; पण त्याचा अहंकार नको
प्रामाणिक असायलाच हवे, तथापि प्रामाणिकपणा जपताना आपल्यातील तो अनन्यसाधारण गुण (एक्सेप्शनल क्वालिटी) असल्याचा अहंकार मात्र डोकावणार नाही, याचीही दक्षता घेता आली पाहिजे. काही प्रामाणिक व्यक्तींच्या वर्तनातून तसा अहंकार डोकावत राहतो. प्रामाणिकपणाला गर्वाचा असा दर्प नसावा, असा संदेश त्यांनी तरुणाईला दिला.
खटला मागे घेण्याचा अधिकार केवळ सरकारी वकिलाला
खटला मागे घेण्याचा अधिकार सरकारलाही नाही, तो केवळ सरकारी वकिलाला आहे, इतके ते पद महत्त्वाचे आहे. सरकारी वकील या पदावर काम करताना त्या पदाची प्रतिमा उजळावी, त्या पदाचा गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा, त्यांना कायद्याचा धाक वाटावा, हा उद्देश ठेवून मी काम करत आलो आहे. त्या पदाचा सन्मान जनसामान्यांमध्ये वाढावा हेही माझे ध्येय मी पूर्णत्वास आणू शकलो.