‘स्थायी’त वादाची ठिणगी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:24 IST2018-03-16T01:24:36+5:302018-03-16T01:24:36+5:30
मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांच्या नेतृत्वातील पहिल्याच स्टँडिंगमध्ये दोन नवनियुक्त सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. ही तू-तू, मै-मै आगामी सभेतही कायम राहणार काय, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून,......

‘स्थायी’त वादाची ठिणगी!
ऑनलाईन लोकमत
अमरावती : मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांच्या नेतृत्वातील पहिल्याच स्टँडिंगमध्ये दोन नवनियुक्त सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. ही तू-तू, मै-मै आगामी सभेतही कायम राहणार काय, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून, स्थायीत खेळीमेळीचे वातावरण असावे, विरोध नोंदवून घ्यावा, मात्र शाब्दिक चकमक टाळायला हवी, अशी सांघिक प्रतिक्रिया उमटली आहे.
स्थायी समिती सभापती म्हणून अविरोध निवड झाल्यानंतर प्रथमच कलोती यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी १ वाजता स्थायीची सभा झाली. सभेच्या सुरूवातीलाच दैनंदिन स्वच्छतेच्या एकल कंत्राटाचा मुद्दा चर्चेस घ्यायचा की नाही, यावरून मतमतांतरे झाली.
याबाबत प्रशासनाकडून कुठलाही प्रस्ताव न आल्याने चर्चा करणे योग्य होणार नाही, असा सूर स्थायीत नव्याने प्रवेशलेल्या भाजप सदस्याने लावला. तर ‘चर्चा झालीच पाहिजे’ अशी भूमिका अन्य पक्षातील नवनियुक्त सदस्याने घेतली.
दोन्ही नवख्या स्थायी सदस्यांमधील शाब्दिक चकमक भाजप सदस्यानेच वडीलकीची भूमिका घेत थांबविली. तथापि, दोन भिन्न पक्षांतून आलेल्या दोन सदस्यांमध्ये झालेली चकमक ‘पुढील युद्धा’ची नांदी ठरली. कलोतींना आता सभापती म्हणून स्थायी सभागृहाचा ‘विवेक’ जपावा लागणार आहे. मात्र, गुरुवारच्या बैठकीत झालेल्या हमरीतुमरीवरून स्थायीच्या पुढील बैठकीतही असेच रणकंदन होईल का, असा भीतियुक्त स्वर अधिकारी, विभाग प्रमुखांमध्ये उमटला आहे. दरम्यान, स्थायी समिती बैठक बंद दरवाजाआड घेतली जाते. स्थायीमधील कामकाज बाहेर येऊ नये, अशी त्यामागील भूमिका असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, अन्य महापालिकांमधील स्थायीचे कामकाज आमसभेप्रमाणे चालत असताना, महापालिकेत कुठली प्रथा चालविली जात आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.