स्थायीची ८५० कोटींच्या अर्थसंकल्पावर मोहोर
By Admin | Updated: March 24, 2016 00:36 IST2016-03-24T00:36:22+5:302016-03-24T00:36:22+5:30
दोन दिवसांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर स्थायी समितीने २०१६-२०१७ या आर्थीक वर्षासाठीच्या ८५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पावर बुधवारी मोहोर उमटविली .

स्थायीची ८५० कोटींच्या अर्थसंकल्पावर मोहोर
९९ कोटी शिल्लक : ३१ ला आमसभेसमोर
अमरावती : दोन दिवसांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर स्थायी समितीने २०१६-२०१७ या आर्थीक वर्षासाठीच्या ८५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पावर बुधवारी मोहोर उमटविली .३१ मार्चला हा अर्थसंकल्प आमसभेसमोर ठेवला जाईल.महापालिका प्रशासनाने मंगळवारी ८४२ कोटी ९४ लाख ८९ हजार ४६० रुपयांचे अंदाजपत्रक स्थायीसमोर ठेवले होते. त्यात सुधारणा दर्शवून ९९.६४ कोटी रुपयांच्या शिलकीच्या अर्थसंकल्पाला स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी मंजूरी दिली.
नगरसेवकांच्या वार्डविकास स्वेच्छा निधीत वाढ करण्यात आली आहे.नगरसेवकांना त्यांच्या वार्डातील मुलधूत सुविधांसह अन्य कामे त्वरित करता यावीत,यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृह आणि शौचालय निर्मितीसाठी तीन कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने सुमारे ७ कोटी रुपयांची वाढ सुचविली आहे.
मार्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली १६ सदस्यीय स्थायी समितीत मॅराथॉन चर्चा झाली.स्मार्ट सिटीसाठी येणाऱ्या निधीसह फिशरी हब ,अमृत योजना ,राजापेठ उड्डानपुलासाठी येणारा निधी भांडवली उत्पन्नात समाविष्ट करण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात महापालिकेला महसुली व भांडवली निधीमधून ९४२ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.गतवर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात वाढ दर्शविण्यात आली आहे.९४२ कोटींमध्ये ४०५ कोटी महसुली उत्पन्न तर ५२२ कोटी भांडवली उत्पन्न अपेक्षित आहे.९४२ कोटी रुपयांमधून सुमारे ८४२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.त्याआधारावर ९९.६४ कोटी रुपये शिल्लक राहणार असल्याचा अंदाज मार्डीकर यांनी व्यक्त केला आहे.
करवाढीला सर्वपक्षीय विरोध झाल्याने आयुक्तांनी जुन्याच दराने मालमत्ता कराचे लक्ष्य निर्धारित केले आहे. दरम्यान, उत्पन्नाच्या नव्या स्त्रोताबाबत अमरावतीकराच्या २९ मार्चननतर आलेल्या सुचना ही स्वागतार्ह आहेत, असे आवाहन अविनाश मार्डीकर यांनी केले आहे.