टंचाई आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींची खडाजंगी
By Admin | Updated: July 21, 2014 23:37 IST2014-07-21T23:37:57+5:302014-07-21T23:37:57+5:30
यंदाच्या खरीप हंगामात पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी केवळ २२ टक्केच खरीप पेरण्या झाल्या आहेत. मात्र यातही दुबार पेरणीचे संकट उभे असताना

टंचाई आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींची खडाजंगी
पालकमंत्र्यांची शिष्टाई : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तापली सभा
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी केवळ २२ टक्केच खरीप पेरण्या झाल्या आहेत. मात्र यातही दुबार पेरणीचे संकट उभे असताना दुष्काळाची स्थिती गंभीर होत आहे. या मुद्यावर शेतकऱ्यांसाठी प्रशासकीय यंत्रणा काहीच करीत नसल्याने संतप्त सत्ताधारी काँग्रेस व अपक्ष आमदार आणि जिल्हा परिषद सदस्यांची पालकमंत्र्याच्या उपस्थितीत पार पडलेल्या टंचाई आढावा बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली.
जिल्ह्यात शेतकऱ्यांना अद्यापही गारपिटीचे अनुदान पूर्णपणे मिळाले नसल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असा मुद्दा या सभेत लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषद सदस्य अभिजित ढेपे यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडला असता, धामणगाव रेल्वे मतदारसंघात ९५ टक्के गारपीटग्रस्तांना मदत वाटप झाल्याचे धामणगावचे लोकप्रतिनिधींनी सांगताच, या मुद्यावर सभागृहात सत्ताधारी व विरोधी गटात चांगलीच जुंपली. या मुद्यावर वादळ उठले असताना आमचे-तुचे प्रश्न उपस्थित झाल्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा गांभीर्याने घेत यावर आक्षेप नोंदविला. अखेर पालकमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यामुळे हा तणाव निवळला. वातावरण शांत होत नाही तोच पीक विम्याच्या मुद्यावर तसेच शेतकऱ्यांना कर्जवाटपाबाबत बँकांकडून दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचा मुद्या उपस्थितीत झाला. यावर लोकप्रतिनिधींसह देशमुख यांनी विरोधकांच्या या प्रश्नाला बगल देण्याच्या प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी या मुद्यावर सभागृहात आक्रमक भूमिका घेत ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतील त्या बँकेच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी कृषीमंत्र्यांकडे उपस्थित लोकप्रतिनिधींनी केली. याशिवाय जिल्ह्यातील संत्रा मृग बहर फुटला नाही, तर आंबिया गळाला. त्यामुळे संत्रा उत्पादकांना फटका बसल्यामुळे संत्रा उत्पादकांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली. दरम्यान लोकप्रतिनिधींच्या आक्रमकतेमुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संत्रा बागांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाच्या यंत्रणेला दिले. हा अहवाल प्राप्त होताच मदतीबाबत आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहात पालकमंत्र्यांनी दिले.
सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या या आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेत ही सभा चांगलीच गाजवली. सभेला आ. वीरेंद्र जगताप, बच्चू कडू, अनिल बोंडे, अभिजित अडसूळ, यशोमती ठाकूर, केवलराम काळे, रावसाहेब शेखावत, बबलू देशमुख, जि.प. अध्यक्ष सुरेखा ठाकरे, महापौर वंदना कंगाले, विभागीय आयुक्त डी.आर. बनसोड, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल भंडारी व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.