प्रलंबित कामांचा विचारला जाब

By Admin | Updated: October 15, 2016 00:18 IST2016-10-15T00:18:42+5:302016-10-15T00:18:42+5:30

जिल्ह्यात सिंचनाच्या लहान कामांना प्राधान्य देऊन तातडीने जलयुक्त शिवार अभियानासह इतर विभागातील ...

Pending tasks are asked | प्रलंबित कामांचा विचारला जाब

प्रलंबित कामांचा विचारला जाब

जिल्हा परिषद : आढावा बैठक , मुदतीत कामे करण्याचे निर्देश
अमरावती : जिल्ह्यात सिंचनाच्या लहान कामांना प्राधान्य देऊन तातडीने जलयुक्त शिवार अभियानासह इतर विभागातील रखडलेल्या कामांचा जाब विचारला. यावेळी ही कामे मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींनी दिलेत.
जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात जि.प. अध्यक्ष सतीश उईके यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार, आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा आदी विभागाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला आ. वीरेंद्र जगताप, शिक्षण व बांधकाम सभापती गिरीश कराळे सदस्य मोहन सिंगवी, मोहन पाटील सीईओ किरण कुलकर्णी, कार्यकारी अभियंता प्रमोद तलवारे, के.टी उमाळकर, किशोर साकुरे आदी उपस्थित होते. शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची सन २०१५-१६ आणि २०१६-१७ मध्ये धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघात कुठलीही कामे प्रस्तावित केली नाही. जी कामे मंजूर केली तीसुद्धा पूर्ण केलेली नाही. एकीकडे निधी उपलब्ध असताना असताना अखर्चिरीत्या पडून लाहिला. यावर आ. जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जलयुक्त शिवारच्या कामांची मागणी होत असताना प्रशासन मात्र काहीच करीत नसेल तर अभियानाचा उपयोग तरी काय, असा सवाल झेडपीच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांना त्यांनी केला. सन २०१५-१६ मधील अपूर्ण कामे व नवीन लहान कामे जलयुक्त शिवार अभियानात घेऊन ही कामे ३१ डिसेंबरच्या वाढीव मुदतीत करावी तसेच सन २०१६-१७ मध्ये जास्तीत जास्त कामे समन्वयातून घेऊन ती मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचा सल्ला आ. जगताप यांनी दिला आहे. दोन वर्षांपासून समाजकल्याण विभागाने नव्याने नामकरण करण्यात आलेल्या योजनेत व आताच्या अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेचा निधी खर्च केला नाही. संबंधित गावे वंचित राहील ही बाब खेदजनक आहे. अशी प्रतिक्रिया उपस्थित लोकप्रतिनिधींनी नोंदविली. या विषयावर संबधित अधिकाऱ्यांची चांगलीच काणउघाडणी केली आहे. यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा अशी ताकिद देत यापुढे असे प्रकार कदापीही सहन केले जाणार नसल्याची तंबी प्रशासनाला दिली आहे. शिवाय ज्या गांवासाठी हा निधी मंजूर झाला तो विकास कामांवर खर्च करावा असे निर्देश दिले आहेत.
याशिवाय आरोग्य विभागाकडे धामनगांव मतदार संघातील धामक येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मंजूर असल्यावर यावर कुठलीही कारवाई आरोग्य विभागाने केली नाही. विशेष म्हणजे यासाठी मुख्यमंत्री सुध्दा सकारात्मक आहेत. आरोग्य केंद्रासाठी नवीन जागा निश्चित करून सुमारे ७ कोटी रूपयांच्या निधीतून ही वास्तु साकारली जाणार आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याचे सूचना आरोग्य अधिकाऱ्यांनी देण्यात आली आहे. पाणी पुरवठा विभागा मार्फत मंजूर केलेल्या पाणी पुरवठयाच्या योजना पुर्ण करण्यात याव्यात अशा विविध मुद्यावर बैठकीत सुचना लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. (प्रतिनिधी)

सीईओंकडून कामे मार्गी लावण्याची ग्वाही
धामणगाव रेल्वे मतदारसंघातील तीनही तालुक्यांतील जलयुक्त शिवार, समाजकल्याण विभागाची अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजना, बांधकाम, शिक्षण आणि पाणीपुरवठा विभागातील मागील दोन वर्षांपासून प्रलंबित कामे आहेत अशी सर्व कामे समन्वयातून मार्गी लावण्याचे आश्वासन आढावा बैठकीत सीईओ किरण कुलकर्णी यांनी आमदार व झेडपी पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

वर्गखोल्या दुरूस्तीची
चौकशी करा
नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यात सुमारे ५ कोटी ४० लाख रूपयांच्या निधीतून वर्गखोल्याची दुरूस्ती केली आहे. या २९ कामांची सीईओंनी तुरतुदीनुसार दुरूस्ती झाली किंवा नाही याची चौकशी करण्याची सूचना केली आहे. यात जे अधिकारी दोषी असतील त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी उपस्थित लोकप्रतिनिधींनी केली आहे. ही मागणी सीईओंनी मान्यदेखील केली आहे.

उपअभियंत्याची कानउघाडणी
सिंचन विभागाचे धामणगाव, चांदूररेल्वेचे उपअभियंता डाखोरे यांना लोकप्रतिनिधींनी विविध मुद्यांवर जाब विचारला. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांची कानउघाडणी करण्यात आली.

Web Title: Pending tasks are asked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.