आमसभेत वराह, श्वान अन् उंदरांचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 23:03 IST2018-06-20T23:03:31+5:302018-06-20T23:03:54+5:30

महानगरपालिकेच्या आमसभेत बुधवारी मोकाट वराह, भटकी श्वान आणि उंदरांचा बोलबाला राहिला. वर्षभरापासून आम्ही मोकाट श्वान आणि वरांहांच्या प्रश्नावर घशाला कोरड पडेपर्यंत बोलत असताना पशुशल्य विभागाकडून ठेवणीतील उत्तरे दिली जातात, मात्र या प्राण्यांच्या वाढत्या प्रकोपामुळे आम्हाला प्रभागात फिरण्याची सोय उरली नाही.

Peas in the general body, dog and mouse mug | आमसभेत वराह, श्वान अन् उंदरांचा बोलबाला

आमसभेत वराह, श्वान अन् उंदरांचा बोलबाला

ठळक मुद्देराजापेठ उड्डाणपुलासाठी रेल्वेची बैठक : ६७ लाखांच्या खर्चावर आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महानगरपालिकेच्या आमसभेत बुधवारी मोकाट वराह, भटकी श्वान आणि उंदरांचा बोलबाला राहिला. वर्षभरापासून आम्ही मोकाट श्वान आणि वरांहांच्या प्रश्नावर घशाला कोरड पडेपर्यंत बोलत असताना पशुशल्य विभागाकडून ठेवणीतील उत्तरे दिली जातात, मात्र या प्राण्यांच्या वाढत्या प्रकोपामुळे आम्हाला प्रभागात फिरण्याची सोय उरली नाही. त्यामुळे मोकाट श्वान आणि वराहाबाबत अंतिम निर्णय घ्यावा, या मुद्यावर अनेक नगरसेविका संतप्त झाल्या. त्यावर पिठासीन सभापतींनी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
एखाद्या प्रश्नावर नगरसेविकांचे अभ्यासपूर्ण मत नोंदविणे, हे बुधवारच्या आमसभेचे वैशिष्ट्ये ठरले. याशिवाय ‘हायराइज’बिल्डिंगला एडीटीपीने बेकायदेशीररीत्या मान्यता दिल्याचा मुद्दाही दखलपात्र ठरला. फेब्रुवारीमध्ये नेहरु मैदानातील शाळेला लागलेल्या आगीच्या चौकशी अहवालाच्या चर्चेदरम्यान उंदरांच्या वाढत्या घुसखोरीला आळा घालण्याची सूचना करण्यात आली. बुधवारी सकाळी ११ वाजता आमसभेला सुरुवात झाली. नवनियुक्त आयुक्त संजय निपाणे यांची ही पाहिलीच आमसभा असल्याने सर्वांचे लक्ष त्यांनी वेधले. आयुक्तांनी पहिल्याच आमसभेत छाप सोडली. दरम्यान श्वान निर्बिजीकरणावर ६७ लाख रुपये खर्च झाले असताना त्याची उपलब्धी काय, असा सवाल धीरज हिवसे यांनी उपस्थित केला.राजेंद्र कॉलनी ते दस्तुरनगर रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप करून संबंधित कंत्राटदाराविरुद्ध महापालिकेने काय कारवाई केली, या प्रदीप हिवसे यांच्या प्रश्नावर उपअभियंता सुहास चव्हाण गडबडले. या रस्त्याच्या बांधकामात मुरुमाऐवजी मातीचा वापर झाल्याचा आरोप हिवसे यांनी केला. आॅडिट होईपर्यंत त्या कामाचे देयक देऊ नये, ही हिवसे यांची सूचना सभापतींनी मान्य केली. त्यानंतर सुमती ढोके, पद्मजा कौंडण्य, कुसूम साहू, राधा कुरील, अनिता राज, नीलिमा काळे, रेखा भुतडा, वंदना हरणे, जयश्री कुºहेकर, जयश्री डहाके, विविधपक्षीय नगरसेविकांनी सहायक पशु शल्यचिकित्सक सचिन बोंद्रे यांना धारेवर धरले. वराह नियंत्रणाबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने पुढील आठवड्यात ते काम सुरू होईल, असे बोंद्रे यांनी सांगितले. मात्र नगरसेविकांचे त्यावर समाधान झाले नाही. नगरसेविकांनी स्वच्छतेवर सवाल उपस्थित केला. विरोधी पक्षनेता बबलू शेखावत यांनी प्रशासनाववर ताशेरे ओढत २ कोटींचे फायर वाहन हत्ती म्हणून उभे असताना मोकाट श्वान वा वराह पकडणाऱ्या एजंसीची देयके दिली जात नाहीत, प्रशासनाने देयकांचा प्राधान्यक्रम ठरवावा, अशी सूचना त्यांनी केली.
विकसकांशी एडीटीपीचे संगनमत
महापालिका क्षेत्रात १६ मिटर उचीच्या इमारतींना बेकायदा मान्यता दिल्याचा गंभीर आरोप बसपाचे नगरसेवक ऋषी खत्री यांनी केला.त्या १८० ते २०० इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा नसताना त्यांना नाहरकत देण्यात आली, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यावर सचिन रासणे यांनी अन्य एका इमारतीचा संदर्भ देऊन तेथेही महापालिकेने मंजुरी कशी दिली, त्यात मोठे आर्थिक गौडबंगाल झाल्याचा आरोप केला. त्यावर संबंधित इमारतीची तपासणी करण्याचे आश्वासन आयुक्त संजय निपाणे यांनी दिले.
माजी महापौर भडकले
नियमित एडीटीपी सुरेंद्र कांबळे रजेवर गेल्याने त्यांचा प्रभार नगररचना विभागातील वासनकर यांच्याकडे दिला. मात्र, प्रभार घेतल्यानंतरही ते त्यांच्या दालनात बसले नाहीत. त्यांना आमसभेची कुठलीही माहिती नव्हती. यावरून ते माजी महापौर विलास इंगोले यांच्या रोषाला बळी पडले. आपण महापालिकेचे जावई आहात काय, असा सवाल इंगोलेंनी उपस्थित केला. प्रभार असूनही त्यांनी एकाही फाईलवर स्वाक्षरी केली नसल्याचा रोष त्यांनी व्यक्त केला. त्यावर त्यांचा वेळ निश्चित कौल दण्यात येईल, असे आयुक्तांनी आश्वस्त केले.

Web Title: Peas in the general body, dog and mouse mug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.