विद्यापीठात बोगस चालानद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा
By Admin | Updated: May 4, 2017 00:07 IST2017-05-04T00:07:36+5:302017-05-04T00:07:36+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील परीक्षा विभागात एकाच क्रमांकाचे दोन चालान आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

विद्यापीठात बोगस चालानद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा
एकाच क्रमांकाचे दोन चालान : लेखा विभागातर्फे कारवाईची शिफारस
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील परीक्षा विभागात एकाच क्रमांकाचे दोन चालान आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वित्त व लेखा विभागाने दोन विद्यार्थ्यांवर संशय व्यक्त केला असून त्यांच्यावर कारवाईची शिफारस केली आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागात पुनर्मुल्यांकनासाठी सादर आवेदनासोबत एकाच क्रमांकाच्या दोन चालान आढळून आल्या आहेत. मात्र, चालानवर अक्षरी व आकड्यात रकमेबाबत तफावत असल्याने हे प्रकरण लेखा विभागाने पुढील चौकशीसाठी गोपनीय विभागाकडे पाठविले होते. गोपनीय विभागाने चौकशीनंतर दोन चालान बनावट असल्याचा अहवालदिला आहे. यात दोन विद्यार्थ्यांवर कारवाई प्रस्तावित आहे. मात्र, ही कारवाई कोणत्या विभागाने करावी, याबाबत एकमत होऊ शकले नाही. परीक्षा, लेखा आणि गोपनीय विभाग बनावट चालानप्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर कारवाईसाठी टोलवाटोलवी करीत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. एकाच क्रमांकाच्या दोन चालानवर वेगवेगळे शुल्क भरण्यात आल्याचे दिसून आले आहे. एकाच क्रमांकाच्या चालानवर ४०५ आणि ४११ अशी रक्कम असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. बोगस चालानवर रक्कम लिहिताना ृआकड्यात व अक्षरात खोडतोड करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. बोगस चालान प्रकरण हे दोन विद्यार्थ्यांना भोवणार आहे. मात्र, परीक्षा विभागात पुनर्मुल्यांकनासाठी सादर अर्जासोबत बोगस चालान जोडले जात असताना संबंधित कर्मचाऱ्यांना ते दिसू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
दोन विद्यार्थ्यांच्या चालानची रक्कम जमा झाली नसल्याने ते तपासले असता हे चालान बोगस असल्याचे स्पष्ट झाले. परीक्षा विभागाशी संबंधित प्रकरण असल्याने त्याच विभागाने कारवाई करावी, असे अपेक्षित आहे. त्यानुसार कारवाईबाबत शेरा नोंदविला आहे.
- शशीकांत आस्वले
वित्त व लेखा अधिकारी, विद्यापीठ