पे अॅन्ड पार्क, ओगलेंचा पुनर्प्रवेश गाजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 22:58 IST2018-04-15T22:58:51+5:302018-04-15T22:58:51+5:30
राजापेठ ते मालवीय चौकादरम्यानच्या उड्डाणपुलाखाली महापालिकेने सुरू केलेली पे अॅन्ड पार्क व्यवस्था आणि तत्कालिन सहायक आयुक्त राहुल ओगले यांचा होऊ घातलेला पुनर्प्रवेश या दोन विषयांवर आमसभा गाजण्याचे संकेत आहेत.

पे अॅन्ड पार्क, ओगलेंचा पुनर्प्रवेश गाजणार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राजापेठ ते मालवीय चौकादरम्यानच्या उड्डाणपुलाखाली महापालिकेने सुरू केलेली पे अॅन्ड पार्क व्यवस्था आणि तत्कालिन सहायक आयुक्त राहुल ओगले यांचा होऊ घातलेला पुनर्प्रवेश या दोन विषयांवर आमसभा गाजण्याचे संकेत आहेत. १६ एप्रिलला सकाळी ११ वाजता महापालिकेची आमसभा होऊ घातली असून ती प्रशासकीय विषयानंतर स्थगित करण्यात येणार असल्याची माहिती सत्ताधिशांच्या गोटातून आली आहे.
व्यावसायिक संकुलातील गाळे वितरणावरून प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये पेटलेले युद्ध पाहता आमसभेतही त्यावर रणकंदन अपेक्षित आहे. उड्डाणपुलाखालील पे अॅन्ड पार्कला भाजपच्या नगरसेवकांसह काँग्रेस, बसपा व मनसेने विरोध केल्याने पे अॅन्ड पार्क बाबतचा निर्णय आमसभेत चर्चिला जाईल. आमसभेत निर्णय न झाल्यास मनसेने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ‘पे अॅन्ड पार्क’ प्रायोगिक तत्वावर ६ महिन्यांसाठीच असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी बहुपक्षियांचा विरोध पाहता आमसभेत त्यावर वादळी चर्चा अपेक्षित आहे.
याशिवाय तत्कालिन सहायक आयुक्त राहुल ओगले यांना पुन्हा महापालिकेच्या सेवेत रूजू करण्याचा प्रस्तावही आमसभेत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने ओगले यांच्या बाजूने निर्णय दिल्याने पुढील आदेशापर्यंत ओगले यांना कामावर रूजू करून घेण्यासाठी प्रशासनाने प्रशासकीय प्रस्ताव पाठविला आहे. त्यावर घमासान अपेक्षित आहे.
प्रस्तावावर चर्चा नाहीच!
मागील काही आमसभा दुपारपूर्वीच स्थगित करण्यात आल्याने विषयपत्रिकेची लांबी वाढत चालली आहे. नगरसेवकांच्या प्रस्तावावर चर्चा होत नाही. मागील वर्षभरापासून प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यामुळे बहुतांश नगरसेवकांमध्ये असंतोष असून वांझोट्या चर्चावर वेळ न घालवता प्रस्तावांवर चर्चा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, सोमवारच्या सभेतही प्रस्तावावर चर्चा होणे शक्य नसल्याचे संकेत आहेत.
विषय समिती सदस्यांची घोषणा
महापालिकेतील चारही विषय समित्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नव्या समिती सदस्यांची घोषणा सोमवारच्या आमसभेत केली जाणार आहे. ८७ सदस्यीय सभागृहात भाजपकडे ४९ सदस्यांचे पाठबळ असल्याने चारही समित्यांमध्ये त्यांच्या प्रत्येकी पाच नगरसेवकांची वर्णी लागेल. महापालिकेत विधी, शहर सुधार समिती, माध्यमिक, पूर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समिती व महिला व बालकल्याण अशा चार विषय समित्या आहेत. त्यावर प्रत्येकी ९ सदस्य नव्याने पाठविले जातील.