पवार म्हणाले, ती कारवाई मंडलिकांची
By Admin | Updated: July 9, 2016 00:02 IST2016-07-09T00:02:01+5:302016-07-09T00:02:01+5:30
दस्तुरनगर परिसरात गुरुवारी झालेली अतिक्रमणाची कारवाई महापालिकेची नसून ती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी ...

पवार म्हणाले, ती कारवाई मंडलिकांची
अमरावती : दस्तुरनगर परिसरात गुरुवारी झालेली अतिक्रमणाची कारवाई महापालिकेची नसून ती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी केल्याचे महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. आम्ही केवळ त्या कारवाईला सहकार्य केले, अशी भूमिका पवारांनी फेरीवाल्यांच्या निवेदनावर उत्तर देताना घेतली. युवा स्वाभिमानच्या नेतृत्वात शंभरांवर फेरीवाल्यांनी शुक्रवारी आयुक्तांचे दालन गाठले. आपण या संदर्भात पोलीस आयुक्तांशी बोलू. मात्र आपणही त्यांना भेटून आपली फिर्याद मांडा, अशी सूचना पवार यांनी युवा स्वाभिमानचे शहराध्यक्ष संजय हिंगासपुरे यांना केली. यावेळी आयुक्तांनी दस्तुरनगरमधील भाजीमंडीची वस्तुस्थिती मनपा पदाधिकाऱ्यांकडून समजून घेतली व स्वत: थोड्याच वेळात दस्तुरनगरची पाहणी करु, असे आश्वासनही दिले.
मागील दोन दिवसांपासून महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त सहकार्याने शहरात अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेण्यात आली आहे. गुरुवारी दस्तुरनगर चौकातील गौरक्षणलगत असलेल्या भाजीमंडीवर बुलडोझर चालविण्यात आला. याखेरीज अन्य अतिक्रमण भुईसपाट करण्यात आले. त्या विरोधात आयुक्तांकडे रोष व्यक्त करण्यात आला.
अतिक्रमण पथक प्रमुखाविरुद्ध रोष
अमरावती : या मोहिमेत ज्यांची दुकाने उध्वस्त करण्यात आली त्यांनी शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास महापालिका गाठली व थेट आयुक्तांनाच विचारणा केली. तत्कालिन पालकमंत्री विखे पाटील यांच्या आदेशाने दस्तुरनगर परिसरात शेतकऱ्यांना जागा देण्यात आली होती. मात्र अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी कुठलीही नोटीस आणि पूर्वसूचना न देता बुलडोझर चालविला, असा आरोप फेरीवाल्यांकडून करण्यात आला. आमच्या हातगाड्यांवर, खोक्यांवर बुलडोझर चालविल्याने आम्हांवर उपासमारीची वेळ येवून ठेपल्याचे सांगण्यात आले. युवा स्वाभिमानचे हिंगासपुरे, अभिजित देशमुख, अनुप अग्रवाल यांनी हा मुद्दा रेटून धरला. त्यावर आयुक्तांनी ‘स्पॉट व्हीजीट’ करण्याची ग्वाही दिली. तद्नंतर या फेरीवाल्यांनी आयुक्त कार्यालयासमोर सुमारे १ तास ठिय्या दिला. (प्रतिनिधी)
मग कारवाई कुणाची?
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी महापालिकेत आढावा बैठक घेवून शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी एक महिन्याची ‘डेडलाईन’ दिली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी पोलीस आणि मनपाला संयुक्त कारवाईचे आदेश देत १५ दिवसाचाच अल्टीमेटम दिला. तत्पूर्वी आ. सुनील देशमुख यांनीही वाहतूक आणि अतिक्रमणासंदर्भात पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्तांशी चर्चा केली होती. वटहुकूम कारवाईची धडक मोहीम सुरू करण्यात आली मात्र ज्या ठिकाणी विरोध केला जातो तेथे कारवाईची जबाबदारी परस्परांच्या अंगावर ढकलली जाते आहे.
पाच दिवसात हॉकर्स झोन निश्चित करा : मागणी
शहर अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश देवून पालकमंत्र्यांनी फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आणून ठेवल्याचा आरोप करत पाच दिवसाच्या आत हॉकर्स झोन निश्चित करावे, अशी मागणी युवा स्वाभिमानच्यावतीने करण्यात आली. यावेळी दस्तुरनगर भाजीमंडी, फळ विक्रेते व अन्य फेरीवाल्यांची लक्षणीय उपस्थिती होती.