पटवारी संघाचा असहकार आंदोलनाचा इशारा
By Admin | Updated: January 12, 2015 22:43 IST2015-01-12T22:43:30+5:302015-01-12T22:43:30+5:30
शासन परिपत्रकाप्रमाणे व आदेशाप्रमाणे अंमलबजावणी न झाल्यामुळे विदर्भ पटवारी संघाने आता याविरोधात असहकार आंदोलन सुरू करण्याचा इशारा सोमवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

पटवारी संघाचा असहकार आंदोलनाचा इशारा
अमरावती : शासन परिपत्रकाप्रमाणे व आदेशाप्रमाणे अंमलबजावणी न झाल्यामुळे विदर्भ पटवारी संघाने आता याविरोधात असहकार आंदोलन सुरू करण्याचा इशारा सोमवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
विदर्भ पटवारी संघाच्या शासन मान्य मागण्या व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार अद्यापही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्देश देऊनसुद्धा तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर अन्याय केला जात आहे. यामुळे आता पटवारी संघाने १२ जानेवारीपासून असहकार आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनानुसार तलाठ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये तलाठी यांनी अतिवृष्टी व गारपीटची सन २०११-१२ व २०१३-१४ मध्ये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या अनुदानानित ०.०५ टक्के रक्कम कामाचा मेहताना अद्यापपावेतो दिला नाही, जिल्ह्यामध्ये सन २०१४ पर्यंत झालेल्या लोकसभा व विधानसभा आणि ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदान केंद्रावर व्यवस्थेबाबतची तलाठी, मंडळ अधिकारी यांचे देयके व मानधन द्यावे, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना १२ व २४ वर्षांवरील कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा, शासनाने जून २०१३ ची परिपत्रकाप्रमाणे तलाठी यांना कार्यालयीन भाडे देण्यात आले नाही, त्यामुळे तलाठ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, अशा विविध मागण्यांना घेऊन विदर्भ पटवारी संघाच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हाभरात असहकार आंदोलन सुरू करण्यात आल्याने आता प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
पटवारी संघाच्या मागण्यांबाबत तातडीने विचार करावा, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे संघटनेचे अध्यक्ष प्रमोद राऊत, एस.डी. ढोक, आर. बी. आवटकर, संतोष चवरे, प्रदीप पिंजरकर, आर. एम. पिल्ले, एस.जी. मिश्रा, जे.डी. मालपे, पी.एम. ठाकरे, जे.डी. महल्ले, बोरकर आदींनी दिला आहे. (प्रतिनिधी)