‘पेशंट रेफर टू नागपूर’ कुठवर?
By Admin | Updated: December 12, 2015 00:13 IST2015-12-12T00:13:35+5:302015-12-12T00:13:35+5:30
अपघात असो की एखादा गंभीर आजार दोन-तीन दिवसांनंतर त्या रुग्णाला नागपूरला घेऊन जाण्याचा सल्ला शासकीय रुग्णांलयासह खासगी डॉक्टरांकडून दिलाच जातो.

‘पेशंट रेफर टू नागपूर’ कुठवर?
आरोग्य सुविधांची वानवा : शासकीय रूग्णालयांमध्ये पदांचा अनुशेष
अमरावती : अपघात असो की एखादा गंभीर आजार दोन-तीन दिवसांनंतर त्या रुग्णाला नागपूरला घेऊन जाण्याचा सल्ला शासकीय रुग्णांलयासह खासगी डॉक्टरांकडून दिलाच जातो. पेशंट ‘रेफर टू नागपूर’ असे पालुपद नेहमीच ऐकयला मिळते. त्यावरून स्मार्ट सिटीच्या शर्यतीत असलेल्या आणि अनेक व्हीव्हीआयपींच्या अमरावती शहरातील ‘आरोग्य व्यवस्था’ फारशी चांगली नसल्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालय आता सामान्य माणसांसाठीदेखील आहे किंवा नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. डफरीनमध्ये तर महिन्या-दोन महिन्यांत डॉक्टर व परिचारिकांवर दोषारोपण केले जाते. तेथे आतापर्यंत अनेक बाळ-बाळंतिणींचा मृत्यू झाला. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची अवस्था फारशी चांंगली नाही. साध्या अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला इर्विनमध्ये दाखल केल्यानंतर तास-दोन तासांतच नागपूर किंवा खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णाला नागपूरला हलविण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका शासकीय स्तरावर उपलब्ध नाही. विदर्भाची उपराजधानी म्हणून शेखी मिरविणाऱ्या अमरावती शहराची एकंदरीत आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. (शासकीय रुग्णालयाकडून वेळोवेळी पदांच्या अनुशेषाचा मुद्दा समोर केला जातो. मात्र डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयांमध्येही फारशी वेगळी परिस्थिती नाही. दोन-तीन दिवस उपचार केल्यानंतर येथील डॉक्टर हात टेकण्याची भाषा करून नागपूर हलविण्याचा सल्ला देऊन मोकळे होतात.
राज्यातील सर्वसामान्य जनतेला महागड्या आरोग्य सुविधा स्वस्त दरात आणि चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी राज्यसरकारने सुरू केलेल्या शासकीय संदर्भ सेवा रूग्णालयाची स्थिती दयनीय आहे. त्यामुळे येथील रुग्णालयाची सेवा सलाईनवर आहे.
कुठल्याही परिस्थितीत प्राण वाचविणे आमचे कर्तव्य आहे. उपलब्ध साधन-सामुग्रीच्या भरवशावर जर ते शक्य होत नसेल तर संबंधित रूग्णाला इतरत्र हलविण्यात येते. त्यातही आम्ही शासकीय रूग्णालयांनाच प्राधान्य देतो.
- अरूण राऊत,
जिल्हा शल्य चिकित्सक