कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:01:17+5:30
राज्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासन सांगत असले तरी या बैठकीला उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तेथे डॉक्टर, स्टाफ, साहित्य नसल्याचे बैठकीत स्पष्ट केले होते. तरीही हायरिस्क लोकांना या डेडिकेटेड रुग्णालयात प्रशासनाने हलविले. या बैठकीदरम्यान तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉक्टर पाठविण्याबाबत प्रशासनाला आश्वस्त केले.

कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांची हेळसांड
अनिल कडू ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : स्थानिक डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये हायरिस्क नागरिकांना क्वारंटाईन केले जात आहे. या रुग्णांची हेळसांड होत आहे. शहरातील ६० वर्षीय महिला कोरोना पॉझीटिव्ह आल्यानंतर हायरिस्क १५ लोकांना रविवारी प्रशासनाने येथे क्वारंटाईन केले. यात त्यांना धड बेडशिटही मिळू शकल्या नाहीत.
राज्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासन सांगत असले तरी या बैठकीला उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तेथे डॉक्टर, स्टाफ, साहित्य नसल्याचे बैठकीत स्पष्ट केले होते. तरीही हायरिस्क लोकांना या डेडिकेटेड रुग्णालयात प्रशासनाने हलविले. या बैठकीदरम्यान तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉक्टर पाठविण्याबाबत प्रशासनाला आश्वस्त केले. पण, पहिल्या दिवशी रविवारी त्यांच्याकडून पोहोचला नाही. डॉक्टराविनाच ते लोक त्या ठिकाणी तसेच रात्रभर पडून होते. या हॉस्पिटलमध्ये ४० बेड देण्यात आले. या ४० बेडला आवश्यक असणाऱ्या साध्या बेडशिटही या ठिकाणी उपलब्ध नाहीत. ४० बेडकरिता २४ बेडशिट्स देण्यात आल्या आहेत. १५ हायरिस्क व्यक्ती दाखल करण्यात आल्या त्यावेळी १५ बेडवर १५ बेडशिट्स टाकल्या गेल्यात. दुसऱ्या दिवशी सकाळी या बेडशिट बदलविण्याचा प्रयत्न केला असता, त्या अपुºया पडल्या. या बेडशिट्स स्वच्छ करण्याची, धुण्याचीही व्यवस्था त्या ठिकाणी नाही, यातच सारे आले.
डेडिकेडेट कोविड रुग्णालयाला सोमवारी दोन डॉक्टर रुजू झाले. रुग्णांची हेळसांड आम्ही होऊ देणार नाही. आवश्यक सुविधांसह साहित्य उपलब्ध करून देणाचा आमचा प्रयत्न आहे.
- डॉ. सरवत वर्मा, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर
साधी मेणबत्तीही नाही
हॉस्पिटलमध्ये वीज गेल्यानंतर कुठलीही पर्यायी व्यवस्था नाही. जनरेटर नाही, इन्व्हर्टर नाही, साधी मेणबत्तीही त्या ठिकाणी उपलब्ध नाही. या हॉस्पिटलमध्ये फिव्हर क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. येथे नागरिकांनाच नव्हे तर रुग्णांनाही आत प्रवेश नाही. तपासणी करून घेण्याकरिता आणि वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्याकरिता तासन्तास उन्हात बाहेर उघड्यावर रांगेत उभे राहावे लागते. उन्ह आणि पावसापासून त्यांचे संरक्षण करण्याकरिता कुठलेही शेड प्रशासनाने उभारलेले नाही. साधी बसण्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही त्या ठिकाणी नाही.