रेल्वे गाड्यांमध्ये प्रवासी असुरक्षित

By Admin | Updated: November 1, 2016 00:11 IST2016-11-01T00:11:36+5:302016-11-01T00:11:36+5:30

देशात सर्वात मोठे दळणवळणाचे जाळे असलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये हल्ली प्रवासी असुरक्षित आहेत.

Passengers are insecure in trains | रेल्वे गाड्यांमध्ये प्रवासी असुरक्षित

रेल्वे गाड्यांमध्ये प्रवासी असुरक्षित

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : बनावट तृतीयपंथी, अवैध वेंडर्सचा हैदोस
अमरावती : देशात सर्वात मोठे दळणवळणाचे जाळे असलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये हल्ली प्रवासी असुरक्षित आहेत. धावत्या रेल्वे गाडीत अवैध वेंडर्स, खाद्यपदार्थ विक्रेते, तृतीयपंथी आणि भिक्षेकरूंचा वावर दर पाच मिनिटांनी सुरूच राहतात. विशेषत: पैसे न दिल्यास रेल्वे गाड्यांमध्ये फिरणाऱ्या बनावट तृतीयपंथियांकडून प्रवाशांना मारहाण केली जाते. रेल्वे गाड्यांमध्ये ही बाब नित्याचीच झाली असून या प्रकारामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.
रेल्वे मालमत्ता आणि प्रवाशांच्या संरक्षणाची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाकडे सोपविण्यात आली आहे. मात्र अलिकडे नागपूर ते अकोला या दरम्यान रेल्वे गाड्यात प्रवास ‘नको रे बाबा’ अशी म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे असो वा पॅसेंजर गाड्या यासर्वांमध्ये प्रवासी असुरक्षित आहेत. रेल्वे गाड्यांमध्ये तृतीयपंथी किंवा अवैध वेंडर्स रेल्वे सुरक्षाबल, पोलिसांच्या मान्यतेशिवाय चालू शकत नाहीत. त्याकरिता तृतीयपंथी किंवा अवैध वेंडर्सकडून रेल्वे पोलिसांचे हप्ते ठरल्याचा आरोप वारंवार होत असतो. तसेच बडनेरा, अमरावती, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, वर्धा, पूलगाव, चांदूररेल्वे, धामणगाव, देवळी आदी रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थ कंत्राटदारांना अतिरिक्त वेंडर्सना व्यवसाय करण्याकरिता महिन्याकाठी रेल्वे सुरक्षाबल आणि रेल्वे पोलिसांना मोठी रक्कम पुरवावी लागते. तसेच खिसेकापू तासाप्रमाणे रेल्वे पोलिसांना पैसे मोजत असल्याची माहिती आहे. बडनेरा स्थानकावर खाद्यपदार्थ कंत्राटदारांकडून मान्यतेपेक्षा अधिक वेंडर्सना रेल्वे सुरक्षाबलाकडून परवानगी देण्यात आली आहे. प्लॅटफार्मवर गाडी थांबली की अवैध वेंडर्सचा बाजार बघावयास मिळतो. मात्र, धावत्या गाड्यांमध्ये बनावट तृतीयपंथियांकडून होणारी लूट कधी थांबणार? हा सवाल सामान्य रेल्वे प्रवाशांनी उपस्थित केला आहे. या तृतीयपंथियांच्या टोळीने रेल्वेत प्रवेश केला की ते प्रवाशांकडून मर्जीनुसार पैसे उकळतात. लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये तृतीयपंथी टोळक्याने प्रवेश करून प्रवाशांना हेरतात. या गोरखधंद्यासाठी रेल्वे स्थानकाच्या सीमा ठरल्या आहेत. एका सीमेतच तृतीयपंथी अथवा अवैध वेंडर्सना व्यवसायाची रेल्वे सुरक्षा बलाकडून परवनगी दिली असली तरी चित्र वेगळेच आहे. त्यामुळेच रेल्वे प्रबंधकांचीही या प्रकारला मूक संमती तर नाही ना, हा प्रश्न आहे.

खासदार केव्हा लक्ष घालणार?
अमरावती, बडनेरा रेल्वे प्लॅटफार्मवर प्रवाशांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली असताना ती केव्हा दूर करणार असा सवाल सर्वसामान्य प्रवाशांनी खा. आनंदराव अडसूळ यांच्या पुढ्यात ठेवला आहे. लोकप्रतिनिधी हे वातानुकूलित डब्यांमध्ये प्रवास करीत असल्याने त्यांनी अन्य रेल्वे डब्यांमधील प्रवाशांच्या समस्या दूर कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठीच यंत्रणा आहे. अवैध वेंडर्स किंवा तृतीयपंथी हैदोस घालून प्रवाशांना वेठीस धरत असतील तर याबाबत वरिष्ठांना कळविले जाईल. प्रवाशांच्या तक्रारीला प्राधान्य देवू.
- व्ही. डी. कुंभारे,
वाणिज्य निरिक्षक, बडनेरा रेल्वे स्थानक

Web Title: Passengers are insecure in trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.