नगरपालिका उपाध्यक्षांविरूद्ध अविश्वास ठराव पारित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:24 IST2021-03-13T04:24:39+5:302021-03-13T04:24:39+5:30
वरूड : स्थानिक नगर परिषदेच्या नगराध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर झाल्यानंतर भाजपच्या ११ नगरसेवकांसह विरोधी नगरसेवकांनी उपाध्यक्ष मनोज गुल्हाने ...

नगरपालिका उपाध्यक्षांविरूद्ध अविश्वास ठराव पारित
वरूड : स्थानिक नगर परिषदेच्या नगराध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर झाल्यानंतर भाजपच्या ११ नगरसेवकांसह विरोधी नगरसेवकांनी उपाध्यक्ष मनोज गुल्हाने यांच्याविरूद्धदेखील अविश्वास प्रस्ताव एक महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने शुक्रवारी पालिका सभागृहात मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यात विद्यमान उपाध्यक्ष गुल्हाने यांना केवळ ४, तर विरोधात १८ नगरसेवकांनी मतदान केल्याने अखेर ४ विरुद्ध १८ मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यामुळे आता नवा उपाध्यक्ष कोण? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. यामुळे भाजपमधील दुफळी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
वरूड नगर परिषदेत भाजप १६, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, प्रहार १ आणि वरूड विकास आघाडी १ असे २४ सदस्य आहेत. भाजपच्या तब्बल ११ नगरसेवकांनी विरोधी गटाच्या सात नगरसेवकांना सोबत घेऊन नगराध्यक्ष स्वाती आंडेविरोधात गतवर्षी अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्याचा निर्णय नगरविकास विभागाकडे प्रलंबित असताना, नगरसेवकांनी ३ फेब्रुवारी रोजी उपाध्यक्षांविरुद्ध नगराध्यक्ष आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, १२ मार्च रोजी त्यासाठी नगर परिषदेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात अविश्वास प्रस्तावात्या अनुषंगाने मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी मतदान घेतले. विद्यमान उपाध्यक्ष मनोज गुल्हाने यांच्या बाजूने चार नगरसेवकांनी, तर विरोधात १८ नगरसेवकांनी हात उंचावून अविश्वास ठराव मंजूर झाला. अखेर उपाध्यक्ष मनोज गुल्हाने पायउतार झाले. यावेळी नगराध्यक्षा आणि २२ सदस्य उपस्थित होते. उपाध्यक्ष मनोज गुल्हाणे आणि भाजपचे नगरसेवक योगेश चौधरी अनुपस्थित राहिले. अविश्वास ठराव मंजूर झाल्याने रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदी गटनेता नरेंद्र बेलसरे, देवेंद्र बोडखे, छाया दुर्गे यापैकी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पान १ साठी