अर्धवट कालव्याचे पाणी उठले शेतकऱ्याच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:30 IST2018-03-11T22:30:14+5:302018-03-11T22:30:14+5:30
अपुऱ्या कालव्याच्या बांधकामामुळे मोठ्या प्रमाणात पाणी संत्राबागेसह शेतात शिरून त्याचा तलाव होत आहे.

अर्धवट कालव्याचे पाणी उठले शेतकऱ्याच्या जीवावर
आॅनलाईन लोकमत
परतवाडा : अपुऱ्या कालव्याच्या बांधकामामुळे मोठ्या प्रमाणात पाणी संत्राबागेसह शेतात शिरून त्याचा तलाव होत आहे. परिणामी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने आर्थिक फटका बसत असल्याची तक्रार तब्बल तीन वर्षांपासून संबंधित विभागाला शेतकऱ्याने केली. परंतु, हेकेखोर अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप धामणगाव गढी येथील योगेश डांगे या शेतकऱ्याने केला आहे.
अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी हे गाव मेळघाटच्या पायथ्याशी वसलेले आहे. परिसरातील चंद्रभागा प्रकल्पाचे पाणी कालव्यातून शेतकºयांना ओलितासाठी देण्यात येते. मात्र, कालव्याचे बांधकाम अर्धवट करण्यात आल्याने ओलितासाठी सोडण्यात आलेले पाणी थेट शेतात शिरून तलाव होत आहे. धामणगाव गढी येथील शेतकरी योगेश साहेबराव डांगे यांनी सदर प्रकाराबद्दल २० नोव्हेंबर २०१४ ते आतापर्यंत मध्यम लघू पाटबंधारे विभाग, अचलपूरसह जिल्हाधिकाºयांना पत्र दिले. मात्र, त्याचा काहीएक परिणाम झाला नाही. नेहमीप्रमाणे आश्वासनाची खैरात देत त्यांची बोळवण करण्यात आल्याचा अनुभव त्यांना आला आहे.
माझी चूक काय नुकसान भरपाई द्या
अर्धवट कालवा बांधून त्याचे पाणी शेतात सोडल्याने मागील तीन वर्षांत मोठे आर्थिक नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई आपण मिळावी आणि शेतात शिरणारे पाणी कालवा पूर्ण करून बंद करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात या गरीब शेतकºयाने केली आहे.
कोण देणार न्याय?
मी अल्पभूधारक शेतकरी आहे. न्याय मागण्यासाठी मागील तीन वर्षांपासून कार्यालयात चपला झिजल्या. सोबत कागदी घोडे नाचविले. मात्र, पदरी निराशाच आली. शेतात पाणी शिरत असल्याने संत्रा झाडांची वाढ खुंटली आहे, तर इतर पिके सडल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. सरकार मायबाप शेतकºयांच्या पाठीशी असल्याचे सांगते. मात्र, त्यांचे प्रशासनातील अधिकारी शेतकऱ्यांच्या जिवावर उठल्याचा प्रकार धामणगाव गढी येथे उघडकीस आला आहे. कोण देणार न्याय, हाच सवाल योगेश डांगे या अल्पभूधारक शेतकºयाने विचारला आहे.