शाळा धरताहेत पालकांना वेठीस
By Admin | Updated: July 10, 2014 23:21 IST2014-07-10T23:21:21+5:302014-07-10T23:21:21+5:30
मुलाच्या भविष्यासाठी त्याने शाळेचे चक्क ६ पंखे दुरुस्त करुन दिले. येथील एका नामांकित शाळेत मुलाला ५ व्या वर्गात प्रवेश मिळावा म्हणून पालकाला शाळेने असे वेठीस धरले आहे.

शाळा धरताहेत पालकांना वेठीस
बिनधास्त मागण्या : मोर्शीतील नामांकित शाळेतील प्रकार
मोर्शी : मुलाच्या भविष्यासाठी त्याने शाळेचे चक्क ६ पंखे दुरुस्त करुन दिले. येथील एका नामांकित शाळेत मुलाला ५ व्या वर्गात प्रवेश मिळावा म्हणून पालकाला शाळेने असे वेठीस धरले आहे.
तालुक्यात एकूण ४० माध्यमिक शाळा आहेत. त्यात मोर्शी शहरातील एका उर्दू शाळेसह ८ शाळांचा समावेश आहे. शहरातील शासकीय माध्यमिक शाळा जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झाल्यावर या शाळेला अवकळा आली. जि.प. शाळांसह शहरातील इतर माध्यमिक शाळांतील शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शोधात उन्हाळयाची सुटी घालवावी लागते. मात्र शहरातील एक नामांकित शाळा याला अपवाद ठरली आहे.
या नामांकित खासगी शाळेत प्रवेशाकरिता शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पालक धाव घेतात. चवथ्या वर्गाचा निकाल लागताच एका आठवड्याच्या आत या शाळेतील प्रवेशक्षमता पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते.
खासगी शाळांना मागील अनेक वर्षांपासून शासकीय वेतनेतर अनुदान मिळाले नाही. ते केव्हा मिळेल याची कोणतीही शाश्वती नाही. ही अडचण भागविण्याकरिता ‘गुणवत्तेच्या आधारावर’ प्रवेश दिल्यानंतर राहिलेल्या प्रवेशाकरिता पदाधिकारी, संचालकांच्या सोबतच गावातील प्रतिष्ठितांच्या चिठ्ठीवर या शाळेत प्रवेश मिळतो; मात्र, शाळेच्या दैनंदिन कामकाजाकरिता होणाऱ्या खर्चासोबतच, शाळेची रंगरंगोटी, डेस्कबेंचेस, ट्युबलाईट, पंख्यांचा खर्च भागविण्याची अडचण शाळेतील अशा अडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून भागविण्यात येते. वस्तूस्वरुपात दान न देणाऱ्यांकडून रोख स्वरुपातही दान स्वीकारले जाते. अशांना संस्थेची पावती दिली जाते. (तालुका प्रतिनिधी)