वनविभागाच्या कामावर परप्रांतीय मजूर
By Admin | Updated: May 15, 2016 00:18 IST2016-05-15T00:18:48+5:302016-05-15T00:18:48+5:30
तुमसर व मोहाडी तालुक्यातील चार वनपरिक्षेत्रांतर्गत विविध कामावर मध्य प्रदेशातील मजूर कामावर असल्याची धक्कादायक माहिती आहे.

वनविभागाच्या कामावर परप्रांतीय मजूर
वनविभाग म्हणते, जॉब कार्डधारकांनाच काम : मध्य प्रदेशातील मजुरांचा समावेश
तुमसर : तुमसर व मोहाडी तालुक्यातील चार वनपरिक्षेत्रांतर्गत विविध कामावर मध्य प्रदेशातील मजूर कामावर असल्याची धक्कादायक माहिती आहे. रोजगार हमी योजनेवर सदर मजूर कामे करीत आहेत. महाराष्ट्रात मध्य प्रदेशाचे मजूर कामावर ठेवण्याचे कारण काय असा प्रश्न येथे उपस्थित होतो.
तुमसर व मोहाडी तालुकयातील कांद्री, नाकाडोंगरी, लेंडेझरी व तुमसर असे चार वनपरिक्षेत्र आहेत. या चारही वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे शुरु आहेत. यात वृक्ष लागवड, वन तलाव, पाणी साठवणूक, तलावांचे काम, वृक्ष लागवडीकरिता खड्डे तयार करण्यात येत आहेत. राज्यातील मजूरांनाच येथे काम मिळावा याकरिता प्रत्येक राज्य तसे नियोजन करते.
तुमसर तालुक्यातील वन परिक्षेत्रात स्थानिक मजुरांना डावलून मध्य प्रदेशातील मजुरांना कामावर ठेवण्यात आले आहे. स्थानिक मजूर नियमांवर बोट ठेवतात त्यामुळेच परप्रांतीय मजुरांना रोजगार हमीच्या कामावर ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
वन विभागात उन्हाळ्यात मोठया प्रमाणात अनेक कामे केली जातात. निधीही मोठ्या प्रमाणात प्राप्त होतो. कामे दाखविणे गरजेचे आहे. त्याकरिता येथील अधिकाऱ्यांनी नवीन शक्कल लावून महाराष्ट्राच्या सीमेजवळील गावातील मध्य प्रदेश राज्यातील मजुरांना वन विभागाने कामावर ठेवले आहे.
एका राज्यातील मजूर दुसऱ्या राज्याच्या शासकीय कामावर नियमानुसार ठेवता येत नाही, असा नियम आहे. स्थानिक मजूरांच्या हाताला काम मिळावे याकरिता प्रत्येक राज्य नियोजन करते. परप्रांतीय मजूरांना कामावर ठेवण्याची येथे रितसर परवानगी घेतली का, असा प्रश्न उपस्थित होतो. या प्रकरणाची चौकशीची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
वनविभागात कार्यरत मजुरांचा जॉब कार्ड स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत तयार केला जातो. संबंधित मजुरांची मजुरी बँकेत खात्यावर जमा होते. नियमानुसार जॉब कार्डधारकांनाच वनविभागातील विविध योजनेच्या कामावर ठेवण्यात येते. त्यामुळे स्थानिकांनाच रोजगार प्राप्त होतो.
अरविंद जोशी,
वनपरिक्षेत्राधिकारी, तुमसर.