४६ वर्षांपासून परांडे परिवाराचा न्यायासाठी संघर्ष
By Admin | Updated: January 31, 2016 00:14 IST2016-01-31T00:14:18+5:302016-01-31T00:14:18+5:30
अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून येथील एसटी आगारात १९६९ मध्ये सहकुटुंब आत्महत्या करणाऱ्या उत्तमराव परांडे...

४६ वर्षांपासून परांडे परिवाराचा न्यायासाठी संघर्ष
अमरावती : अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून येथील एसटी आगारात १९६९ मध्ये सहकुटुंब आत्महत्या करणाऱ्या उत्तमराव परांडे या वाहकाच्या मुलाने ४६ वर्षांपासून चालविलेल्या संघर्षाची प्रदर्शनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयालगतच्या भिंतीवर लावली आहे. शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधून मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी त्यांनी हे अभिनव आंदोलन सुरू केले आहे.
२७ जुलै १९६८ रोजी अमरावती ते वरखेड मार्गावर बसमध्ये ३ प्रवासी विनाटिकीट आढळल्याने वाहक उत्तमराव परांडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. अन्यायकारक अधिकाऱ्यांच्या छळास कंटाळून वाहक उत्तमराव परांडे यांनी १ डिसेंबर १९६९ रोजी एसटी आगारात पत्नी, मुलासह स्वत: विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेत त्यांची दीड ते चार वर्षांची मुले बचावली. दीपक व प्रकाश या मुलांनी वडिलांवरील अन्यायाचा लढा ४६ वर्षांपासून सुरू ठेवला. या घटनेबाबत त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी हजारोंच्या संख्येत सामील होऊन संपाद्वारे निषेध व्यक्त केला.
शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
अमरावती : स्व. सुदामकाका देशमुख यांच्या अध्यक्षतेत झालेल्या शोकसभेत तत्कालीन एसटी अधिकाऱ्यांनी परांडे यांची मुले सज्ञान झाल्यावर त्यांना एसटी महामंडळात नोकरी देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर मृतावर कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले. मात्र परांडे यांची मुले सज्ञान झाली. मात्र महामंडळाला आश्वासनाचा विसर पडला. या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी प्रकाश व दीपक परांडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया लगतच्या भिंतीवर परांडे अन्याय संघर्ष प्रदर्शनी लावून शासन, प्रशासन व समाज यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
या आंदोलनात त्यांनी ज्यांचे लहानपणीच संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असेल अशा पात्र अनाथ व्यक्तींकरिता सरकारने नोकरीची तरतूद करावी, एसटी महामंडळात ५ टक्के विशेष बाब सेवाभरती ही पूर्ववत सुरू करावी व प्रकाश याला योग्यतेनुसार नोकरी द्यावी, कोणत्याही पात्र अनाथ व्यक्तीस त्याची विशिष्ट परिस्थिती पाहून सरकारी योजनेचा लाभ प्राधान्याने देण्याची तरतूद करावी, सरकारी कार्यालयात अनाथ व्यक्तीची हेटाळणी थांबवावी व कर्मचाऱ्यांना दंडीत करावे आदी मागण्या केल्यात. (प्रतिनिधी)