विदर्भातील संत्रा उत्पादकांची परवड
By Admin | Updated: December 12, 2015 00:17 IST2015-12-12T00:17:24+5:302015-12-12T00:17:24+5:30
वरुड-मोर्शी तालुक्यात साडेपाच लाख टन संत्रा उत्पादन केला जातो. योग्य भावानुसार या व्यवसायात ९०० कोटी रुपयांची उलाढाल होते.

विदर्भातील संत्रा उत्पादकांची परवड
संत्र्याची मातीमोल कहाणी : मोर्शी-वरुड तालुक्यात ९०० कोटींची उलाढाल
संजय खासबागे वरुड
वरुड-मोर्शी तालुक्यात साडेपाच लाख टन संत्रा उत्पादन केला जातो. योग्य भावानुसार या व्यवसायात ९०० कोटी रुपयांची उलाढाल होते. परंतु भाव कमी मिळत असल्याने संत्रा उत्पादकांना उत्पादन खर्च काढणे कठीण झाले आहे. संत्र्याच्या लागवड क्षेत्रात वाढ होत असली तरी भाव मात्र मिळत नसल्याने अमरावती जिल्ह्यात उत्पादित होणारा संत्रा माघारला आहे.
राज्यात केवळ विदर्र्भात संत्राबागा आहेत. यामध्ये एक लाख २६ हजार हेक्टर जमिनीवर संत्रा पीक घेतले जाते. जिल्ह्यात संत्राचे ७० हजार हेक्टर क्षेत्र आहे असून वरुड मोर्शी तालुक्यात ३५ हजार हेक्टर जमिनीत संत्राचे पीक घेतले जाते. वरुड तालुका संत्र्यासाठी प्रसिध्द आहे. संत्रा लागवडीखाली २१ हजार हेक्टर शेतजमीन असून उत्पादन घेणारी संत्रा झाडे १७ हजार ६७१ हेक्टर ६७ आर जमिनीवर आहे.
या परिसरात ३५ टक्कयापेक्षा अधिक जमिनीवर संत्राचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. दरवर्षी मृग बहराची संत्रा उत्पादन घेतले जात होते. परंतु गत चार वर्षांपासून सतत गारपीट आणि अतिवृष्टीमुळे संत्रा उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसत असल्याने मृग बहरापेक्षा आंबिया बहराची फळे घेण्यास ७० टक्के संत्रा उत्पादकांनी सुरुवात केली. आंबिया बहराच्या उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना कमी जोखीम पत्करावी लागते. नैसर्गिक जोखीमेपेक्षा आता संत्रा मोठ्या प्रमाणात असल्याने परप्रांतीय व्यापाऱ्यांनी संत्राच्या दरामध्ये कमालीची घसरण केली. साडेपाच लाख टन संत्रा उत्पादित केला जातो. यामध्ये साडेतीन लाख टन आंबिया बहराची संत्रा तर दोन लाख टन मृग बहराचे संत्रा उत्पादन घेतले जाते. ७० टक्के आंबिया बहर घेतला जातो. संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस येण्याकरिता मध्यस्थी करून विकला जाणारा संत्राची पध्दत बंद होऊून थेट मार्केटिंगची व्यवस्था आणि अधिक क्षमतेचे प्रक्रिया केंद्र उभारल्यास संत्रा उत्पादकांना चांगले दिवस येतील. परंतु हे होणार तरी कधी, हा प्रश्नच आहे. यापासून ९०० कोटी रुपयांची उलाढाल संत्राफळामुळे होते. परंतु भावात घसरण आणि योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने उलाढालीवर विपरित परिणाम झाला आहे.
परप्रांतीय बाजारपेठेत संत्रा विक्री केंद्राची मागणी
शासनाने संत्राकरीता कोणतेही असे ठोस पाउल उचलले नाही. एवढेच नव्हे तर संत्रा दिल्ली, पंजाब, मुंबई, कलकत्ता, विजयवाडासह आदी परप्रांतीय बाजारपेठेत पाठविला जात असल्याने व्यापाऱ्यांकडून चांगलीच पिळवणूक होते. दुपट्टा प्रकारात खरेदी विक्री होत असल्याने आंधळा व्यवहार होतो. नेमकी यातच फसगत होते. परंतु संत्र्याकरिता बाजारपेठ असली तर संत्र्याला सुगीचे दिवस येतील. अन्याय संत्रा उत्पादनाला अखेरची घरघर लागल्याशिवाय राहणार नाही. राज्यात तसेच परप्रांतीय बाजारपेठेमध्ये संत्राविक्री केंद्र राज्यसरकारने सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
७० वर्षांच्या उत्पादनाला खीळ बसण्याची शक्यता
उत्तर भारतात संत्र्याचे महत्त्व कमी झाले. वातावरणीय बदलानुसार भाव मिळत नाही. बााजरपेठेत स्थिरता नसल्याने ७० वर्षांची परंपरा असलेल्या संत्राला उत्पादनाला अखेरची घरघर लागली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या परिसराचे वैभव असलेल्या संत्रा उत्पादनाला खीळ बसण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेकांनी संत्राबागा तोडून डाळिंबाच्या बागा लावल्यात, हे विशेष.
संत्रा विक्रीच्या वेळी व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दलालांना दोन टक्के कमीशन द्यावे लागते. व्यापाऱ्यांकडूनही एक टक्का मिळतो. या व्यवहारात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते. शासनाने थेट मार्केटिंग केल्यास संत्र्याला भाव मिळेल. मात्र नागपुरी संत्रा म्हटले जाणाऱ्या नागपुरात केवळ ४ ते ५ मॉल आहेत.
- रमेश जिचकार, सचिव, महाराष्ट्र
राज्य संत्रा उत्पादक महासंघ.