एसआरपीएफ कॅम्प परिसरात बिबट्याची दहशत
By Admin | Updated: March 25, 2015 00:12 IST2015-03-25T00:12:38+5:302015-03-25T00:12:38+5:30
स्थानिक एसआरपीएफ कॅम्प परिसरात काही दिवसांपासून वाघाच्या जातकुळीतील हिंस्त्र श्वापद आढळून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे.

एसआरपीएफ कॅम्प परिसरात बिबट्याची दहशत
वैभव बाबरेकर अमरावती
स्थानिक एसआरपीएफ कॅम्प परिसरात काही दिवसांपासून वाघाच्या जातकुळीतील हिंस्त्र श्वापद आढळून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे.
त्या परिसरात फिरणारा प्राणी पट्टेदार वाघ की बिबट हादेखील संशोधनाचा विषय ठरला आहे. वनविभागाने त्यासाठीच सर्च अभियान सुरु केले आहे. सोमवारी रात्री वनविभागाच्या शिकारी प्रतिबंधक पथकाला मादी बिबट व एक पिल्लू आढळून आले. एका महिलेला पट्टेदार वाघ दिसला. वनविभागाने मात्र तो प्राणी वाघ असल्याची पुष्टी अद्यापर्यंत केली नाही.
काही दिवसांपूर्वी वडाळीजवळील एसआरपीएफ पसिरसरात बिबट अनेकदा आढळून आला. त्यानंतर बिबट्याने एका श्वानाला उचलून नेल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. आता पुन्हा सोमवारी व मंगळवारी बिबट दृष्टीस पडल्याने खळबळ उडाली. बच्चे कंपनीला वाघ दिसल्याचीही चर्चा परिसरात सुरु झाली आहे.
मंगळवारी सकाळी अर्चना गिरुळकर ही महिला अंगाणातील कपडे वाळू घालत असताना त्यांना इमारत क्रमांक ११ समोरील नाल्याजवळ झुडूपात दोन बिबट दिसले.
यांनी बघितला पट्टेदार वाघ
वडाळी कॅम्प परिसरातील ५०० क्वार्टर परिसरात सकाळी ८ वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघ अनेकांच्या दृष्टीस पडला. इमारत क्रमांक ११ जवळील सर्व रहिवाश्यांनी पट्टेदार वाघ बघितल्याने परिसरात दहशद पसरली आहे. प्रतीभा मेश्राम, अर्चना गिरुळकर व सिरसाट यांनी प्रत्यक्ष पट्टेदार वाघ बघितल्याचे.
सीसीटीव्हीत बिबट कैद
५०० क्वार्टर परिसरातील नागरिकांनी मुद्दामच सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. त्यामध्ये बिबट एका श्वानाला उचलून नेताना कैद झाला आहे. चोरपावलांनी बिबट्याने श्वानावर हल्ला करुन त्याला उचलून नेल्याचे जीवंत चित्रण नागरिकांकडे उपलब्ध आहे.
वन्यप्राण्यांच्या धोका कमी करण्यासाठी काय करावे
पहाटे, सायंकाळी व रात्रीच्यावेळी जंगलात एकटे जाणे टाळावे.
जंगलाला लागून असलेल्या भागात भिंत असावी.
बिबट दिसल्यास जंगलात जाणारा मार्ग मोकळा ठेवावा.
कुठलाही आक्रमक पवित्रा घेऊ नका. अशावेळी बिबट हल्ला करु शकतो.
कचरा व शिळे अन्नपदार्थांची विल्हेवाट लावा जेणेकरून कुत्रे येणार नाहीत.