पंढरीच्या पांडुरंगा बिगी-बिगी धाव रे,
By Admin | Updated: July 1, 2015 00:44 IST2015-07-01T00:44:22+5:302015-07-01T00:44:22+5:30
आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.

पंढरीच्या पांडुरंगा बिगी-बिगी धाव रे,
पाण्यावाचून तळमळते आता सारे गाव रे
पावसाची दडी : खरिपाची पेरणी धोक्यात
संजय जेवडे नांदगाव खंडेश्वर
आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. पावसाचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मृग नक्षत्रात सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी सुरु केली. जवळपास १७ ते २२ जूनपर्यंत पावसाची जोमात सुरुवात झाल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीतील बियाणे दडपले गेले, तर काही शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी साचल्याने दलदल निर्माण होऊन ट्रॅक्टरची पेरणी खोळंबली होती. नंतर दोन तीन दिवसांनी शेतकऱ्यांंनी पेरणीला सुरुवात केली. पण २२ जूनपासून पावसाने दांडी मारल्याने आता शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे. तालुक्यात आतापर्यंत ३५ हजार ४२२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. संत्रा बहर फुटलाच नाही. सुरुवातीच्या पावसामुळे संत्रा पिकाने नवती काढली. नंतर पावसाचा खंड व कडक उन्हामुळे संत्राबागेत मृग बहर फुटलाच नाही. वातावरणातील बदल व त्याचा झालेल्या विपरीत परिणामामुळे संत्राबागा फुटल्या नसल्याचे संत्रा उत्पादक रमेश शिरभाते यांनी सांगितले. या तालुक्यात २३ जूनपर्यंत २२२ मी.मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यात ७० टक्क्यांवरील पेरणी आटोपली आहे. मात्र मागील ९ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बियाणे उगवलेच नाही. आदी पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी बँकांचे उंबरठे झिजविले. मागील वर्षीच्या दुष्काळामुळे कित्येक शेतकरी बँकेचे घेतलेले पीक कर्ज परत न करू शकल्याने कर्ज पुनर्गठन करण्यासाठी बँकेच्या वाऱ्या सुरु केल्या. महागडे बियाणे व खते जमिनीत पेरली. आणि आता मोड आल्याने दुबार पेरणीचे संकट नशिबी आले आहे, अशी या तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा आहे. किती अंत आता पाहसी देवराया, अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
देवा पांडुुरंगा, जनाबाई सोबत तू गोवऱ्या वेचल्या. गोरोबा काकासोबत माती तुडवून लागून मडकी घडू लागली. चोखा-मेळ्या सोबत ढोरे ओढलीस इतकेच नाही तर सावता मेळ्याचा मळाही राखला. भक्तांच्या हाकेला धावून येतोे हे तुझे ब्रीद असताना या दिन बळीराजाची आर्त हाक तुला ऐकू कशी येत नाही? आषाढी एकादशीला पंढरीची वारी घडावी म्हणून कित्येक वारकरी शेतकरी पेरणी आटोपताच तुझ्या चरणावर मस्तक टेकवण्यासाठी पंढरपूरला येतात. आता तर शेतकऱ्यांकडे असलेले सारे बी-बियाणे शेतात पेरले. पाण्यावाचून बियाण्यांचे अंकुर जळू लागले आहेत. वाढलेले मजुुरीचे दर, महागडे बियाणे व रासायनिक खते या बाबीमुळे आधीच जेरीस आलेला शेतकरी आता पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. भकास व आशाळभूत नजरेने आकाशातील ढगाकडे पाहत आहेत. कित्येक शेतकऱ्यांनी आता पेरणीही थांबविली आहे.
प्रखर उन्हामुळे अंकुर जळू लागले
प्रभाकर भगोले चांदूररेल्वे
तालुक्यात पावसाचे प्रमाण अल्प असले तरी दोन दिवसांच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी ४० टक्के पेरणी केली. परंतु गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेले सोयाबीन, कापूस, तूर पावसाअभावी व प्रखर उन्हामुळे कोंब येऊन सुकू लागले आहे. मागील वर्षी अतिपावसाने खरीप पिकाला जबर तडाखा बसून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. परंतु याही वर्षी झालेल्या नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली. परंतु पाऊसच गायब झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. आजपर्यंत सोयाबीन ५८७२ क्विंटल, कापूस १७९ क्विंटल, तूर १८० क्विंटल, ज्वारी ३१ क्विंटल, मूग ४ क्विंटल बियाण्यांची विक्री झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. कृषी विभागाचा ग्रामीण भागातील कृषी सहकाऱ्यांकडून झालेल्या २४ जूनच्या अहवालानुसार सोयाबीन पेरणी १२५६.६० क्विंटल, तूर २८४-८० क्विंटल, कापूस ५२६-५० क्विंटल पेरणी झाल्याची माहिती कृषी खात्याने दिली.