वारकऱ्यांसाठी पंढरपूर रेल्वे विशेष गाडी ९ जुलैपासून
By Admin | Updated: July 6, 2016 23:59 IST2016-07-06T23:59:03+5:302016-07-06T23:59:03+5:30
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल, रुख्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे वारकऱ्यांना ये-जा करता यावे,

वारकऱ्यांसाठी पंढरपूर रेल्वे विशेष गाडी ९ जुलैपासून
नऊ डबे : अकोली रेल्वेस्थानकावरून सुटणार, आरक्षणाची सोय
अमरावती : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल, रुख्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे वारकऱ्यांना ये-जा करता यावे, यासाठी ९ जुलैपासून अमरावती- पंढरपूर विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन अमरावती (अकोली) रेल्वे स्थानकावरून ही गाडी रवाना होणार आहे. या गाडीत तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन वाणिज्य निरीक्षक व्ही.डी. कुंभारे यांनी केले आहे.
पंढरपूर विशेष रेल्वे (गाडी क्र. ०११५५) ही अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकावरून ९, १०, १२ व १३ जुलै रोजी सोडली जाणार आहे. तसेच पंढरपूर ते अमरावती ( गाडी क्र. ०१५६) १०, ११, १६ व १७ जुलै रोजी पंढरपूर येथून सोडली जाईल. या गाडीत एकूण ९ डबे राहतील. न्यू अमरावती, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड या रेल्वे स्थानकांवर थांबे देण्यात आले आहे. अकोली रेल्वे स्थानकाहून दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी पंढरपूरसाठी विशेष रेल्वे रवाना होईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वे प्रशासनाने वारकऱ्यांसाठी पंढरपूर विशेष रेल्वे गाडीची सोय केली आहे. अमरावतीहून ९ डब्यांची निघणारी विशेष रेल्वे ही खामगाव येथून पुन्हा ९ डबे जोडून अशी १८ डब्यांची पंढरपूरकडे मार्गस्थ करणार आहे. या गाडीत सामान्य, आरक्षित डब्यांची व्यवस्था असून पंढरपूरकरिता चार दिवस ही गाडी धावणार आहे. (प्रतिनिधी)