पंढरी शिवारातील ११ दारु कारखाने उद्ध्वस्त!
By Admin | Updated: January 24, 2015 00:01 IST2015-01-24T00:01:12+5:302015-01-24T00:01:12+5:30
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पंढरी, महेंद्री शिवारातील डोंगरदऱ्यांमध्ये बिनबोभाट सुरू असलेले गावठी दारूनिर्मितीचे ११ कारखाने ...

पंढरी शिवारातील ११ दारु कारखाने उद्ध्वस्त!
वरुड : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पंढरी, महेंद्री शिवारातील डोंगरदऱ्यांमध्ये बिनबोभाट सुरू असलेले गावठी दारूनिर्मितीचे ११ कारखाने मोर्शी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरूवारी दुपारी उध्वस्त केले. ही कारवाई सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होती. कारवाई दरम्यान तब्बल दोन लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तालुक्यातील शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सातपूडयाच्या पायथ्याशी पंढरी, महेंद्री शिवारातील डोंगरदऱ्यांमध्ये मोहा रसायनापासून गावठी दारुनिर्मितीचे ११ कारखाने सुरू होते. याची माहिती मिळताच गुरूवारी राज्य उत्पादन शुल्क विभाग, मोर्शीने या कारखान्यांवर धाडी टाकल्या. यामध्ये ६ हजार ७२० मोहा रसायन, २२४ रबरी टयूब, ५० लीटर चे ५० ड्रम, २० लीटरच्या १५ अॅल्युमिनियम चरव्या, आणि ३०० लिटर गावठी दारु असा १ लाख ९३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी विभागाचे निरीक्षक शरद लांडगे, भरारी पथकाचे निरीक्षक शंकर रटवे, दुय्यम निरीक्षक मधुकर उईके, राजेश तायकर, राजेश राठोड, शिपाई खाडे, चव्हाण, गावंडे, जयस्वाल, मोकलकर, जाधव, बंगाले यांच्या पथकाने धाडसत्र राबविले. पंढरी तलावाचे मागील बाजूला वर्धा डायव्हर्शनच्या बोगद्यालगत हे दारू कारखाने सुरु होते.
तालुक्याच्या आसपास एवढया मोठया प्रमाणात गावठी दारु निर्मितीचे कारखाने सुरू असूनही प्रशासनाला याबाबत कोणतीच माहिती नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या भागात केलेली ही आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याची चर्चा आहे. कारवाईमुळे गावठी दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईमुळे अवैध व्यवसायांवर विशेषत: गावठी दारू विक्रेत्यांवर अंकूश बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सातपुड्याच्या पर्वतराजींच्या आश्रयाने सुरू असलेल्या या अवैध व्यवसायांबाबत प्रशासन अनभिज्ञ असल्याने गावकऱ्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले. अवैध दारूनिर्मितीचे केंद्रच उध्वस्त झाल्याने दारूविक्री आटोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सामान्य नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. (तालुका प्रतिनिधी)
घनदाट जंगलाच्या आश्रयाने अवैध व्यवसाय
वरूड तालुक्याला सातपुडा पर्वतरागांचे सरंक्षण लाभले आहे. घनदाट जंगल आणि मोठया प्रमाणावर पशुपक्षी तसेच हिंस्त्र प्राणी आहे. परंतु या जंगलांच्या आश्रयाने विविध अवैध धंद्यांना ऊत आला आहे. यावर अंकुश ठेवण्यास प्रशासन हतबल ठरले आहे. धामणधस, भेमंडी, महेंद्री, पंढरी शिवारातील दारू कारखान्यांमुळे गावठी दारुचा ग्रामीण भागात महापूर येत असल्याचे दिसते.