रंगोत्सवासाठी पळस बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:14 IST2021-03-16T04:14:19+5:302021-03-16T04:14:19+5:30

बहुपयोगी पळस वसंत ऋतूची चाहुल लागताच चहूकडे झाडांना नवी पालवी फुटायला लागते. त्यासोबतच निष्पर्ण, मळकट रंगाच्या पळसावर काळ्या पणत्यांमधून ...

Pallas blossomed for the Rangotsava | रंगोत्सवासाठी पळस बहरले

रंगोत्सवासाठी पळस बहरले

बहुपयोगी पळस

वसंत ऋतूची चाहुल लागताच चहूकडे झाडांना नवी पालवी फुटायला लागते. त्यासोबतच निष्पर्ण, मळकट रंगाच्या पळसावर काळ्या पणत्यांमधून केशरी ज्योती निघायला सुरुवात होते आणि हळूहळू काही दिवसांतच पळसाचे झाड गर्द केशरी फुलांनी बहरून जाते.* प्राचीन साहित्य :

पळसाच्या झाडाची पाने तीन पानांच्या समूहातच असतात. यावरून ‘पळसाला पाने तीनच’ ही मराठी म्हण रूढ झालेली आहे. या वृक्षांना इंग्रजांनी ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’ असे संबोधले आहे. कारण पानगळीनंतर आलेल्या गर्द केशरी रंगाच्या फुलांना ज्वालासारखा आकार असतो व संपूर्ण झाड पेटल्यासारखे दिसते.

कवी कालिदासाने 'ऋतुसंहार' या काव्यात ‘या वृक्षांची अरण्ये म्हणजे दैदिप्यमान अग्नीच होत!’ असे पळसाचे वर्णन केले आहे. या अरण्यामुळे सृष्टी जणू लाल वस्त्र परिधान केलेल्या वधुसारखी दिसते. ख्यातनाम सुफी कवी अमीर खुसरोने पळसफुलांची तुलना सिंहाच्या रक्तरंजीत पंजाशी केलेली आहे.

* भारतीय संस्कृतीत पळसाचे माहात्म्य

हिंदू आणि बौद्ध संप्रदायांमध्ये पळसाला पवित्र वृक्ष मानले जाते. हिंदू धर्मात पळसाची तीन पाने ब्रम्हा, विष्णू व शिवाचे प्रतिक दर्शवितात. अशा पवित्र झाडाची चातुर्मासात आस्थेने पूजा केली जाते. झाडाच्या वाढलेल्या फांद्यांचे तुकडे समिधा म्हणून होमहवनात प्राचीन काळापासून वापरतात. यावरून ‘याज्ञिक’ हे संस्कृत नाव दिले असावे. सोडमुंजीत पळसाची लहान काठी त्यांच्या हातात दिली जाते. पळसाची फुले ही श्री सरस्वती आणि कालीमाता या दोन्ही देवींच्या पूजेसाठी भक्तिभावाने वापरली जातात.

* पळसरंगाचे महत्त्व

वसंत ऋतूत येणाऱ्या होळीच्या सणाला या झाडाचे विशेष महत्त्व आहे. धूलिवंदनाला रंगांची उधळण करण्यासाठी पळसफुले पाण्यात उकळून नैसर्गिक व पर्यावरणपूरक रंग घरच्या घरी बनविला जातो. आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असल्यामुळे पळसाची फुले पाण्यात टाकून स्नान केल्यास त्वचारोग नाहिसे होतात व जखमा भरून निघतात. होळीपासून वातावरणातील वाढते तापमान, उन्हाचे दुष्परिणाम तसेच ताप, गोवर, कांजण्या, बारीक पूरळ व घामोळ्या आदी विकारांपासून पळसाची फुले मानवी शरीराचे रक्षण करतात.

पर्यावरणपूरक पळस

गर्द केशरी, फुलपाखरांसारखी दिसणारी, पोपटाच्या चोचीसारखी भासणारी मनमोहक फुले मनुष्यजातीप्रमाणे इतरही प्रजातींना आकर्षित करतात. रंगासोबतच मधग्रंथीचे वरदान असल्यामुळे अनेक कीटक, फुलपाखरे, मधमाशा व पक्षी या झाडावर वास्तव्यास असतात. त्यांच्या माध्यमातूनच परागीकरणाची क्रिया सुलभ व नैसर्गिक रीतीने घडण्यास मदत होते. जणू निसर्गच परागीकरणाला चालना देण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतो. अशाप्रकारे झाडाच्या सर्वांगावर येणारे सर्व प्रकारचे कीटक व अळ्या, कीटकांचे भक्षण करणारे पक्षी, झाडांच्या सालीवर घर करून राहणारे लाखाचे किडे, बिया खाण्यासाठी येणारे पोपट व इतर पक्षी अशी जणू शृंखलाच तयार होते. अशा प्रकारे जैवविविधतेच्या संगोपनाचा उत्तम नमुना व निसर्गपूरक वृक्ष म्हणून पळसाला विशेष दर्जा आहे.

* बहुउपयोगी पळस

जंगलात वास्तव्यास असणाऱ्या जमातींकडून झाडाच्या सालीच्या आतील भागापासून धागे काढून दोर बनविले जातात. सुकलेली फुले पाण्यात उकळून पिवळा रंग काढल्या जातो. कातडी कमविण्यास व रंगकामाकरिता सालीपासून निघालेला डिंक वापरतात. गुरेढोरे व हत्तींना कोवळी पाने खाऊ घालतात. बंगालमध्ये पळसाच्या पानांच्या विडया बांधतात. भारतात पळसाच्या पानांच्या पत्रावळी व द्रोण जेवणाकरिता वापरण्याची जुनी परंपरा आहे. अक्षयतृतीयेला या पत्रावळींचा वापर विदर्भात केला जातो. पत्रावळीमध्ये गरम अन्नाचे सेवन केल्यास शरीराला औषधी गुणधर्माचा लाभ मिळतो. बांबूंच्या कांब्यांचा सांगाडा बनवून त्यावर पळसाची रुंद पाने लावून आच्छादन बनवतात त्याला इरले/मोरा म्हणतात. झाडीपट्टीतील स्त्रिया, मजूर शेतात काम करतांना पावसापासून संरक्षणाकरिता इरल्याचा वापर करतात.

Web Title: Pallas blossomed for the Rangotsava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.