परीक्षा विभागाच्या भिंतीवर पिचकाऱ्या, पान, गुटख्याची रंगरंगोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:14 IST2021-03-23T04:14:29+5:302021-03-23T04:14:29+5:30

परीक्षा नियंत्रक लक्ष देतील का?, कोरोनाचा शिरकाव तरीही कर्मचारी बिनधास्त अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अतिशय महत्त्वाचा गणला ...

Paint of Pichkarya, Paan, Gutkha on the wall of the examination department | परीक्षा विभागाच्या भिंतीवर पिचकाऱ्या, पान, गुटख्याची रंगरंगोटी

परीक्षा विभागाच्या भिंतीवर पिचकाऱ्या, पान, गुटख्याची रंगरंगोटी

परीक्षा नियंत्रक लक्ष देतील का?, कोरोनाचा शिरकाव तरीही कर्मचारी बिनधास्त

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अतिशय महत्त्वाचा गणला जाणाऱ्या परीक्षा विभागातील भिंती रंगोत्सवापूर्वी पान, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या आहेत. परीक्षा विभागात कोरोनाने शिरकाव केला असताना कर्मचारी वर्ग जागोजागी भिंतीवर पान, खर्राच्या पिचकाऱ्या मारत असल्याने खरेच कोरोना संसर्ग कसा रोखला जाईल, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

विद्यापीठात परीक्षा विभाग, लेखा व वित्त, अंकेक्षण विभाग, सामान्य प्रशासन, मुख्य प्रशासकीय ईमारतीसह प्रमुख अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभी कर्मचाऱ्यांची सामूहिक कोरोना चाचणी केली असता तब्बल ४५ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, उघड्यावर थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असताना परीक्षा विभागातील भिंती, साहित्य, कानाकोपऱ्यात पान, गुटख्याच्या पिचकाऱ्या बघितल्यास या विभागातून कोराेना कमी होणार नाही, असे चित्र आहे. उच्च शिक्षित कर्मचारी हेच अकर्तव्यशील वागत असतील, तर इतरांकडून काय अपेक्षा करावी, असा सवाल उपस्थित होत आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागात पाचही जिल्ह्यातून विद्यार्थी, महाविद्यालयीन कर्मचारी शैक्षणिक कामांसाठी येतात. परंतु, भिंतीवर पान, गुटख्याची रंगरंगोटी बघून ते काय बोध घेतील, याचा विचार कर्मचाऱ्यांना करावा लागेल. संत गाडगेबाबा यांचे नाव असलेल्या अमरावती विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे पान, गुटखा खाऊन भिंतीवर थुंकणे, असे वागणे संयुक्तिक नाही, असा सूर उमटत आहे.

------------------

काेरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी सतत कर्मचाऱ्यांना गाईडलाईन दिली जाते. परंतु, हेच कर्मचारी पान, गुटख्याच्या पिचकाऱ्या मारून भिंती रंगवत असतील तर ही बाब योग्य नाही. याबाबत लवकरच परिपत्रक काढून अशा कर्मचाऱ्याना लगाम लावण्यात येईल.

- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ

Web Title: Paint of Pichkarya, Paan, Gutkha on the wall of the examination department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.