संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकांना कोरोना होऊ नये म्हणून त्यांना घराबाहेर पडू न देणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याने स्वत: कोरोना झाल्यानंतर तेवढ्याच धीरोदात्तपणे या विषाणू संक्रमणाशी सामना केला. त्यांच्या अवघ्या आठ महिन्याच्या कोरोना लक्षणे असलेल्या चिमुकल्यालाही यातून त्यांनी सुखरूप बाहेर काढले. एवढेच नव्हे तर १५ दिवसांचा उपचार व स्वास्थ्यलाभानंतर त्या कर्तव्यावर रुजू झाल्या. पतीची खंबीर साथ लाभल्याने ही लढाई यशस्वी केली, अशी प्रतिक्रिया या कोरोनायोद्धा अधिकाऱ्याने दिली आहे. कोरोनाकाळात पोलिसांचे नियमित कामकाज सुरू होते. हे करीत असतानाच सहायक पोलीस निरीक्षक सोनाली मेश्राम यांना ताप आला. डोके दुखायला लागले. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवायला लागली. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी गृहविलगीकरणाचा सल्ला देऊन औषधोपचार सुरू केला. मात्र, अवघ्या आठ महिन्यांचाच मुलगा असल्याने त्याला सोडून राहता येणार नव्हते. त्याला तर कोरोना होणार नाही ना, ही धास्ती आईच्या मनात होती. दोन दिवसांतच त्यालासुद्धा कोरोनाची लक्षणे जाणवयाला लागली. त्याला दिवसभरात ६० ते ७० शिंका आल्या. बाळाचे कोरोना निदान खासगी डॉक्टरांकडे केलेल्या चाचणीतून झाले. मात्र, आठ महिन्यांच्या बाळाची कोरोना चाचणी कशी करावी, हा प्रश्न आई-समोर होता. त्याला अखेर कोरोनासंबंधी औषधोपचार सुरू करण्यात आला. यादरम्यान महावितरणचे शासकीय कंत्राटदार असलेले पती सचिन मेश्राम यांचीसुद्धा चाचणी करण्यात आली. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली. ते सोनाली व चिमुकल्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी या काळात हिंमत दिल्याचे सोनाली सांगतात. १५ दिवस उपचार घेतल्यानंतर त्या १६ मे रोजी कर्तव्यावर रुजू झाल्या. फ्रेजरपुरा ठाण्यात अन्य महिला अधिकारी नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. कोरोनावर मात केली म्हणून फ्रेजरपुरा ठाण्यातील वरिष्ठांनी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह निघाले तेव्हा बाळाची चिंता होती. तो आईशिवाय राहू शकत नव्हता. मास्कसुद्धा कायम घालून घालृू शकत नव्हता. हा काळ भाविनकदृष्ट्या फार कठीण होता. - सोनाली मेश्राम, सहायक पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा पोलीस ठाणे