तांत्रिक अडचणी दूर; स्टार बस खरेदीला मंजुरी

By Admin | Updated: July 10, 2014 23:22 IST2014-07-10T23:22:09+5:302014-07-10T23:22:09+5:30

केंद्र शासनाने जवाहरलाल नेहरु शहरी उत्थान अभियानांतर्गत महापालिकेला मंजूर करण्यात आलेल्या स्टार बस खरेदीतील तांत्रिक अडचणी दूर करण्यात स्थायी समितीला यश आले आहे.

Overcome technical difficulties; Approval of purchase of Star Bus | तांत्रिक अडचणी दूर; स्टार बस खरेदीला मंजुरी

तांत्रिक अडचणी दूर; स्टार बस खरेदीला मंजुरी

अमरावती : केंद्र शासनाने जवाहरलाल नेहरु शहरी उत्थान अभियानांतर्गत महापालिकेला मंजूर करण्यात आलेल्या स्टार बस खरेदीतील तांत्रिक अडचणी दूर करण्यात स्थायी समितीला यश आले आहे. त्यामुळे काही महिन्यांपासून रेंगाळत असलेल्या स्टार बस खरेदीचा मार्ग सुकर झाला असून महानगरातील रस्त्यावर लवकरच ५० बसेस धावणार आहे.
स्व. सुदाम काका देशमुख सभागृहात गुरुवारी स्थायी समितीची बैठक सभापती मिलिंद बांबल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत स्टार बस खरेदी, स्थानिक संस्था कराचे घटलेले उत्पन्न या प्रमुख विषयावर सदस्यांनी प्रशासनाला जेरीस आणले. बैठकीच्या प्रारंभी स्टार बसेसचे पुरवठादार असलेल्या टाटा मोटर्सचे अजयसिंग यांनी ३४ आसनी राहणाऱ्या या बसेससंदर्भात तांत्रिक माहिती देताना स्थायी समितीच्या सदस्यांनी यापूर्वी निर्माण केलेल्या प्रश्नांचे निराकरण केले. केंद्र शासनाने महापालिकेला ६४ स्टार बसेस देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही अडचणी आल्याने आता ५० बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारीसुध्दा केली आहे. २० कोटी रुपये बस खरेदीकरिता तर ८ कोटी रुपये शेड उभारणी, बांधकाम आदीवर खर्च केले जाणार आहेत. दरम्यान टाटा मोटर्सने पहिली बस निर्माण झाल्यानंतर ती प्रात्यक्षिकासाठी महापालिकेत आणावी, असे ठरविण्यात आले. विलास इंगोले, जयश्री मोरे, धीरज हिवसे, अजय गोंडाणे, राजेंद्र तायडे, अंबादास जावरे आदींनी एलबीटी तूटसंदर्भात शासनाला कळविण्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र एलबीटी अधीक्षक सुनील पकडे यांनी एलबीटी बाबतची वस्तुस्थिती यापूर्वी शासनाला कळविल्याची माहिती बैठकीत दिली. स्टार बसेस खरेदीचा मुद्दा निकाली निघाल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडल्याचे दिसून आले. सर्व काही नियमानुसार असताना तांत्रिक मुद्दा पुढे करुन बसेस खरेदीचा विषय लांबणीवर पडला होता. अखेर स्थायीने खरेदीला मंजुरी दिल्याने ५० बसेस खरेदी केल्या जाणार आहे. बैठकीला सभापती मिलिंद बांबल यांच्यासह विलास इंगोले, सुगनचंद गुप्ता, अजय गोंडाणे, नूरखॉं, धीरज हिवसे, जयश्री मोरे, अंबादास जावरे, कांचन डेंडुले, कुसूम साहू, योजना रेवस्कर, वंदना हरणे, राजेण्र तायडे, सारिका महल्ले, कांचन उपाध्याय, प्रवीण हरमकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Overcome technical difficulties; Approval of purchase of Star Bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.