महापालिकेत बाहेरच्या कंत्राटदारांची ‘एन्ट्री’
By Admin | Updated: July 4, 2015 00:42 IST2015-07-04T00:42:26+5:302015-07-04T00:42:26+5:30
महापालिकेतील बांधकाम कंत्राटदार आणि प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्याने विकासकामे ठप्प आहेत.

महापालिकेत बाहेरच्या कंत्राटदारांची ‘एन्ट्री’
आयुक्तांचा निर्णय : सोमवारच्या बैठकीत ठरणार कामवाटपाचे सूत्र
अमरावती : महापालिकेतील बांधकाम कंत्राटदार आणि प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्याने विकासकामे ठप्प आहेत. यामुळे नागरिक हैैराण झाले आहेत. नागरिकांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन, लघु पाटबंधारे, जलसंपदा, पाणीपुरवठा व जिल्हा परिषदेतील कंत्राटदारांना विकास कामे सोपविण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला असून त्याअनुषंगाने सोमवारी ६ जुलै रोजी संबंधित कंत्राटदारांची बैठक बोलविण्यात आली आहे.
चंद्रकांत गुडेवार यांनी १४ एप्रिल २०१५ रोजी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महापालिका सतत चर्चेत आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई, साहित्य खरेदीतील घोटाळा, दर्जाहिन कामांची चौकशी, कंत्राटदारांच्या कामांवर आक्षेप, संकुलात गैरव्यवहार, अवैध बांधकाम, कर वसुलीसाठी घर मोजणी अशा एक ना अनेक प्रकरणात आयुक्तांनी लक्ष घातले आहे. परिणामी आयुक्तांच्या या कारभारावर पदाधिकाऱ्यांसह कंत्राटदारही नाराज आहेत.
एकीकडे कंत्राटदारांच्या थकीत रक्कमेचा प्रश्न सुटत नसल्याने बांधकाम कंत्राटदारांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. अशात विकासकामे ठप्प असल्याची ओरड सदस्यांनी सुरु केल्यामुळे आयुक्तांनी बाहेरील कंत्राटदारांना कामे सोपवून देयके देण्याची शक्कल लढविली आहे.
नागरिकांना वेठीस धरू देणार नाही- आयुक्त
महापालिका कंत्राटदारांचे २५ कोटी रुपये देयकांपोटी थकीत असले तरी नवीन कामांची देयके मिळणार, असे यापूर्वीच ठरविण्यात आले आहे. तरीही कंत्राटदारांनी असहकार्याची भूमिका घेतली आहे. विकासकामांच्या निविदा उचलण्यात आल्या नाहीत. त्यामुळे कंत्राटदारांचा हा निर्णय नागरिकांना वेठीस धरणारा असल्याने बाहेरील कंत्राटदारांना कामे सोपविली जातील, असे आयुक्त चंद्र्रकांत गुडेवार म्हणाले.
खुली स्पर्धा आहे, विरोध कशाला- अण्णा गुल्हाने
बांधकामे घेण्यासाठी आता खुली स्पर्धा असून कोणीही ई-निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो. मग, बाहेरच्या कंत्राटदाराला कशाला विरोध करायचा? आयुक्तांना जे योग्य वाटते, तेच ते करीत आहेत. शिवाय केलेल्या कामांची थकीत देयके मिळणारच, असे महापालिका कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष अण्णा गुल्हाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना संधी
स्थापत्य विभागाच्या दुरुस्तीची कामे आणि अन्य विकासकामे स्पर्धा पध्दतीने करण्यासाठी कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंते, नोंदणीकृत सहकारी संस्था, असहकारी क्षेत्रात काम करणारे कंत्राटदार, निवृत्त अभियंत्यांच्या सहकारी संस्था, लष्करातील निवृत्त, नोंदणीकृत एनजीओ आदींनी कामे घेण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त गुडेवार यांनी केले आहे.