घोरपडीवर ताव मारणारे जिल्ह्याबाहेर पसार
By Admin | Updated: July 27, 2016 23:58 IST2016-07-27T23:58:36+5:302016-07-27T23:58:36+5:30
घोरपडीवर ताव मारणारे आरोपी जिल्ह्याबाहेर पसार झाले असून वनविभागाची शोधमोहीम सुरूच आहे.

घोरपडीवर ताव मारणारे जिल्ह्याबाहेर पसार
जामीन अर्ज : शोधमोहीम सुरूच
अमरावती : घोरपडीवर ताव मारणारे आरोपी जिल्ह्याबाहेर पसार झाले असून वनविभागाची शोधमोहीम सुरूच आहे. याप्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केले असून तिघांच्या जामिनावर २८ जुलै रोजी तर, अन्य तिघांच्या जामिनावर २९ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
पिंपळखुट्यातील रहिवासी मनोज वसंत जगतापच्या संत्राबागेत घोरपडीच्या मांसाची मेजवानी पार पाडली. गुप्त माहितीवरून वनविभागाने धाड टाकून चौकीदार मारोती वाघमारेला अटक केल्यावर अन्य आठ आरोपी पसार झालेत. वनविभागाने आरोपींची घरे, त्यांची मित्रमंडळी व नातेवाईकांच्या घरी शोध घेतला. मात्र, आरोपी सापडले नाहीत. त्यांचे भ्रमणध्वनी देखील बंद आहेत. वनविभाग आरोपींचा कसून शोध घेत आहे. सर्व आरोपी जिल्ह्याबाहेर पसार झाल्याची माहिती वनविभागाने दिली. नऊ आरोपींपैकी मनोज जगताप, हेमंत जिचकार, विलास डहाके, हेमंत देशमुख व आशिष बोबडे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. याच प्रकरणात मंगेश खोब्रागडे नामक व्यक्तीने सुद्धा अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला आहे. मात्र, त्यांना अटकपूर्व जामीन मिळू नये, यासाठी वनविभाग प्रयत्नरत आहे. आरोपींचे मोबाईल क्रमांक वनविभागाने प्राप्त केले असून त्यासंदर्भात सायबर सेलला पत्र दिले आहे. आरोपींचे फोन डिटेल्स वनविभाग तपासणार आहे.
घोरपड शिकार प्रकरणात आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. मात्र, आरोपी जिल्ह्याबाहेर पळाले आहेत. आतापर्यंत सहा आरोपींनी अटकपूर्व जामीन अर्ज सादर केले असून ते रद्द करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
- राजेंद्र बोंडे,
उपवनसरंक्षक, अमरावती