शिंदी-पोही गावात साथीचे रोग पसरण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:13 IST2021-07-28T04:13:01+5:302021-07-28T04:13:01+5:30
सर्वत्र साचले डबके, ठिकठिकाणी खताचे ढिगारे शिंदी बु. : गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शिंदी बु. व पोही येथे पाण्याचे डबके ...

शिंदी-पोही गावात साथीचे रोग पसरण्याची शक्यता
सर्वत्र साचले डबके, ठिकठिकाणी खताचे ढिगारे
शिंदी बु. : गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शिंदी बु. व पोही येथे पाण्याचे डबके साचले आहे. गावाच्या मधोमध शेणखताचे ढिगारे लागण्याने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच साथरोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या दोन्ही गावामध्ये ताप व पोटदुखीने रुग्ण त्रस्त आहेत. गतवर्षी पोही गावात डेंग्यू रुग्णसंख्यात वाढ होत असल्याने जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोशी, डॉ. मुंद्रे व सहायक गटविकास अधिकारी खानंदे यांनी गावाची पाहणी केली असता, गावात घाणीचे साम्राज्य निदर्शनास आले. ग्रामपंचायत कार्यालयास त्वरित उपाययोजना करण्याची तंबी त्यांनी दिली होती. त्याचीच पुनरावृत्ती यावर्षीही होवू शकते, अशी परिस्थिती दोन्ही गावात दिसत आहेत. पोही गावात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले असून, यामुळे सर्वत्र घाण निर्माण झाली आहे. गोठा व शेणखताचे ढीग वस्तीत असल्याने डास उत्पत्तीला पोषक असे वातावरण आहे तसेच मुख्य रस्त्यावरील अंगणवाडीपुढे रपट्याला मोठे भगदाळ पडले आहे. त्यावरून वाहन काढणेही धोकादायक झाले आहे. एवढेच नव्हे तर त्यातून नालीचे पाणी रस्त्यावर येत आहे. आपाले व मसाने ले-आऊटमधील रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने चिखल झाला आहे. ग्रामपंचायतीने याबाबत त्वरित उपाययोजना करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
-----------------
चार-पाच महिन्यांपासून रपटा तुटला आहे. वाॅर्डातील सदस्यांनी गावाच्या समस्यांकडे विशेष लक्ष देऊन त्या सोडवाव्याव्यात.
- विनीत वानखडे, नागरिक, पोही
---------------------
वाॅर्ड क्र. ४ मधील रस्त्याची परिस्थिती दयनीय झाली आहे. ग्रामपंचायतीने खड्डे न बुजविण्यास आम्ही वाॅर्डातील नागरिक उपोषण करू.
- नीलेश कविटकर, नागरिक, शिंदी बु.
-----------------
कर वसुली नसल्यामुळे सामान्य फंडात निधी उपलब्ध नाही. ग्रामस्थांनी कर भरल्यास नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवू.
- बाळासाहेब ठोकणे, ग्रामविकास अधिकारी