चांदूर रेल्वे : तालुक्यातील दहिगाव (धावडे) येेथे कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत रब्बी हंगामातील हरभरा पिकाच्या मार्गदर्शनाकरीता शेतीशाळा पार पडली. यामध्ये माती नमुना तपासणी, पूर्वमशागत, हरभरा पिकांचे विविध वाण, खताची मात्रा, हरभरा पिकावरील किडी व रोग आणि त्याचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन आदी मुद्दे अंतर्भूत होते.
दहिगाव (धावडे) येथील शेतकरी प्रफुल्ल शेलुडकर यांच्या शेतामध्ये शेतीशाळा झाली. समन्वयक पुरुषोत्तम कडू यांनी हरभरा पिकावरील किडी व रोगांची निरिक्षणे कशा पद्धतीने घ्यावी, कीटकनाशक फवारणीची गरज आहे किंवा नाही, याचा निर्णय तसेच हरभरा पिकाची शेंडे खुडणी आणि त्यापासून होणारे फायदे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतीशाळा प्रशिक्षक राहुल बेलसरे, कृषिसहायक नरेंद्र पकडे यांनी आयोजन केले होते. सरपंच राजेंद्र गवई, कृषिमित्र संदीप धावडे, शेतकरी सुमेध नगराळे. शैलेश धावडे, देवानंद वैद्य, अशोक बोरकर, गजानन वैद्य, राजेंद्र खुरद, रमेश ठवकर, प्रकाश निर्मळ, गजानन पाढेन, अजय निर्मळ, गौरव पाढेन, कैलास वानखडे, दीपक निर्मळ यांची उपस्थिती होती.