जिल्ह्यातील कला, क्रीडा शिक्षक एकवटले
By Admin | Updated: October 20, 2015 00:27 IST2015-10-20T00:27:00+5:302015-10-20T00:27:00+5:30
उच्च न्यायालयाने शालेयस्तरावर कला, क्रीडा अध्यापनासाठी कायमस्वरूपी शिक्षकांची आवश्यकता असून शासनाने या शिक्षकांची पदे निर्माण करावी, असा महत्वपूर्ण निर्णय दिला.

जिल्ह्यातील कला, क्रीडा शिक्षक एकवटले
शिक्षण विभागाच्या निर्णयाचा निषेध : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी
अमरावती : उच्च न्यायालयाने शालेयस्तरावर कला, क्रीडा अध्यापनासाठी कायमस्वरूपी शिक्षकांची आवश्यकता असून शासनाने या शिक्षकांची पदे निर्माण करावी, असा महत्वपूर्ण निर्णय दिला. शिक्षण विभागाने मात्र शासनाच्या तिजोरीवरील आर्थिक भार कमी करण्याकरिता कला व क्रीडा शिक्षकांच्या कायम पदभरतीच्या निर्णयाला बगल दिली. या निर्णयाविरूध्द जिल्ह्यातील कला व क्रीडा शिक्षक एकवटले आहेत.
या शासन निर्णयामुळे राज्यातील ए. टी. डी., बी. पी. एड. पदवीधारण केलेल्या लाखो बेरोजगार तरूणांना याचा फटका बसणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील कला, क्रीडा प्रेमी व शिक्षक यांचेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून या अन्यायकारक शासन निर्णयाविरूद्ध जिल्ह्यातील कला व क्रीडा शिक्षक एकत्र येवून दि. ७ आॅक्टोबर २०१५ चा शासन निर्णय त्वरीत रद्द करून शालेय स्तरावर कला, क्रीडा शिक्षकांची उच्च न्यायालयाचे निर्देशान्वये कायम पदे भरण्याकरिता त्वरीत नवीन शासन निर्णय निर्गमीत करून सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती विदर्भ कला शिक्षक संघ व शारिरीक शिक्षक संघटनेच्या संयुक्त निवेदनामधून निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांचेमार्फत शासनाच्या शालेय शिक्षण प्रधान सचिवांना केली आहे.
या निवेदनावर शासनाने त्वरीत सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर या निर्णयाविरुद्ध शिक्षकांचे आंदोलनाद्वारे उग्ररुप धारण केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असा इशाराही विदर्भ कला शिक्षक संघ व शारिरीक शिक्षक संघाचे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
निवेदन देतेवेळी विदर्भ कला शिक्षक संघाचे व शारिरीक शिक्षक संघटनेचे विनोद इंगोले, गणेश भुतडा, एस. आर. पाटील, अनिल लांडे, विलास सिरसाठ, संजय धाकुलकर, आशीष देशमुख, राजेश ढिगवार, संजय श्रीखंडे, हरिविजय कळमखेडे, वैभव काळे, तेजस काळे, किशोर जिरापुरे, शत्रुघ्न टाकसाये, संदीप राऊत, चेतन राठोड, नितीन चव्हाळे, संदीप इंगोले, संदेश गिरी, संतोष अरोरा, अजय आळशी, विजय मानकर, हफीज खान, अब्दुल नईम, मेहंदी अली, दिनेश देशमुख, नुरुद्दीन, आकाश भोयर, कमीर जमील अहमद, वकील अहमद काजी, साजीद खाँ आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)