शिक्षकांनी झुगारले बदल्यांचे आदेश
By Admin | Updated: September 13, 2014 23:34 IST2014-09-13T23:34:17+5:302014-09-13T23:34:17+5:30
प्रशासनात सुधारणा होऊन सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षकांना बढती मिळावी या उद्देशाने दिलेल्या बदल्यांचे आदेश अचलपूर नगर परिषदेंतर्गत येणाऱ्या शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांनी धुडकावून लावले आहेत.

शिक्षकांनी झुगारले बदल्यांचे आदेश
सुनील देशपांडे - अचलपूर
प्रशासनात सुधारणा होऊन सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षकांना बढती मिळावी या उद्देशाने दिलेल्या बदल्यांचे आदेश अचलपूर नगर परिषदेंतर्गत येणाऱ्या शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांनी धुडकावून लावले आहेत. बदल्या झाल्यानंतर बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याची मुदतीची तारीख संपल्यानंतरही बहुतांशी शिक्षक तथा मुख्याध्यापक रुजू होण्यास तयार नाहीत. आपली बदली रद्द करण्यासाठी ते राजकीय दबाव आणत असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे.
अचलपूर नगरपरिषदेंतर्गत अचलपूर-परतवाडा शहर मिळून हिंदी, मराठी, उर्दू माध्यमांच्या एकूण २६ शाळा आहेत. त्यामध्ये कार्यरत काही शिक्षक व मुख्याध्यापक १५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतरही एकाच शाळेत आहेत. त्यामुळे काही शाळांमधील शिक्षकांची मुख्याध्यापकपदाची बढती रोखली गेली तर कुणाच्या सेवाज्येष्ठतेला लगाम लागला. राजकीय दबावामुळे त्यांची बदली करण्याचे धाडस कोणत्याच अधिकाऱ्यांनी आजपर्यंत दाखविले नाही, अशी चर्चा आहे.
जुन्या शहरातील मुख्याध्यापक व शिक्षकांची माहिती घेऊन नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात आला. नगरसेवकांच्या सहमतीने ते निर्गमित करण्यात आले. बदली झालेले काही शिक्षक, मुख्याध्यापक पद नको म्हणून बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्यास तयार नाही. काही जण मुख्याध्यापकपद जाईल म्हणून बदलीच्या जागेवर जाण्यासाठी नकारघंटा वाजवीत आहेत. काही शिक्षक आपली गैरसोय होईल म्हणून जाण्यास तयार नाहीत. दरम्यान काही शिक्षक व मुख्याध्यापकांनी बदली झालेल्या ठिकाणी रुजू झाले आहेत. अजूनही बहुतांशी शिक्षक आपली शाळा सोडण्यास तयार नसल्याने ९ शिक्षकांच्या मुख्याध्यापकपदाच्या बढत्या रखडल्या आहेत.
अचलपूर-परतवाडा शाळेतील अंतराचा विचार केल्यास १ ते २ किलोमीटर अंतरावर नगरपरिषदेच्या शाळा आहेत. शाळा शहरातच असल्यावरही सदर बदली झालेले शिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक शाळा सोडून जाण्यास तयार नाहीत. त्यांच्या बदलीच्या आदेशात ३० आॅगस्ट ही शेवटची तारीख त्यांना देण्यात आली होती. ही तारीख उलटून १० ते १२ दिवस झाल्यावरही काही शिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक पदासाठी स्थानांतरित झालेल्या शाळेत यायला तयार नाहीत. त्यासाठी राजकीय दबावतंत्राचा वापर सुरू आहे. काही जणांना नगरपालिकेच्या शिक्षण विभागाने कारवाईच्या नोटिशी बजावल्या आहेत.