‘त्या’ वादग्रस्त जागेवरील वृक्षारोपण काढण्याचे आदेश
By Admin | Updated: August 14, 2015 01:01 IST2015-08-14T01:01:33+5:302015-08-14T01:01:33+5:30
तालुक्यातील ब्राह्मणवाडा (थडी) ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या चिंचोली येथील बौध्दविहार आणि हनुमान मंदिराच्या जागेचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे.

‘त्या’ वादग्रस्त जागेवरील वृक्षारोपण काढण्याचे आदेश
धार्मिक स्थळांचा वाद : ब्राह्मणवाडा थडी येथे तातडीची सभा
चांदूरबाजार : तालुक्यातील ब्राह्मणवाडा (थडी) ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या चिंचोली येथील बौध्दविहार आणि हनुमान मंदिराच्या जागेचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. पुन्हा याच वादग्रस्त जागेत केलेल्या वृक्षारोपणाने नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. त्यात भारतीय दलित पँथरने चिंचोली येथे बौध्द धर्मियांचा छळ होत असल्याची तक्रार बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या पार्श्वभूमिवर उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी चिंचोली येथे तातडीची बैठक घेऊन वादग्रस्त जागेवरील वृक्षारोपण त्वरित काढण्याचे आदेश ग्रामपंचायतीला दिले आहेत.
चिंचोली येथील हनुमान मंदिराच्या पूर्वेकडे मोकळी जागा आहे. तर दक्षिणेकडे बौध्द विहार आहे. ही मोकळी जागा हनुमान मंदिराच्या मालकीची असल्याचे मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे म्हणणे आहे तर येथून वहिवाटीचा सार्वजनिक रस्ता असल्याचे बौध्द उपासकांचे म्हणणे आहे. हा वाद गेल्या अनेक वर्र्षांंपासून महसूल विभागाकडे सुरू होता. त्यात १२ सप्टेंबर २०१४ रोजी चांदूरबाजारच्या तहसीलदारांनी एक आदेश काढून येथे अतिक्रमण आढळल्यास ते हटविण्याबाबतची कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश ग्रामपंचायत सचिवांना दिले होते. याशिवाय या जागेचे मोजणी शुल्क घेऊन मोजणी अहवाल सादर करण्याचे आदेश उपअधीक्षक तालुका भूमीअभिलेख चांदूरबाजार यांना दिले. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याने या जागेचा वाद कायम आहे. त्यात या जागेवर वृक्षारोपण करण्यात आल्याने त्यात आणखी भर पडली आहे.
स्थानिक ग्रामपंचायत तसेच तहसीलदार यांनी या बाबीकडे लक्ष देऊन तोडगा काढावा, अशी नागरिकांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)