महापालिका अभियंत्यांच्या घरमोजणीचे आदेश
By Admin | Updated: July 3, 2015 00:41 IST2015-07-03T00:41:36+5:302015-07-03T00:41:36+5:30
महानगरात नागरिकांची घरमोजणी सुरु असताना महापालिकेतील अभियंत्यांच्या संपत्तीची माहिती मिळावी,

महापालिका अभियंत्यांच्या घरमोजणीचे आदेश
अमरावती : महानगरात नागरिकांची घरमोजणी सुरु असताना महापालिकेतील अभियंत्यांच्या संपत्तीची माहिती मिळावी, यासाठी आयुक्तांनी अभियंत्यांच्या घरमोजणीचे आदेश दिले आहेत. ही जबाबदारी अतिक्रमण निर्मूलन पथकावर सोपविली असून घरमोजणीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या निर्देशानुसार तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून नागरिकांच्या घरांची मोजणी युद्धस्तरावर चालविली जात आहे. दरम्यान काही हॉटेल, प्रतिष्ठानांची मोजणी करुन दंडात्मक कारवाईचा सपाटा प्रशासनाच्यावतीने सुरु आहे. नागरिकांची घरमोजणी सुरु असल्याने महापालिका प्रशासनाविरुद्ध नाराजीचा सूर उमटू लागला आहे. मात्र, आयुक्तांनी सहायक संचालक नगररचना विभाग, बांधकाम विभाग, प्रकाश विभागात कार्यरत असलेल्या अभियंत्यांच्या घराची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोजणीतून अभियंत्यांकडे असलेली अचल संपत्ती, घराचे स्वरुप व त्यांची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न आयुक्तांचा आहे. नागरिकांंच्या तक्रारीवर कवडीची दखल न घेणाऱ्या अभियंत्यांच्या घराची मोजणी करण्याचा निर्णय घेतल्याने अभियंते हैराण झाले आहेत. तसेच यापूर्वी सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या अभियंत्यांच्याही घराची मोजणी केली जाणार आहे. अभियंत्यांच्या घरांची मोजणीची जबाबदारी ही अतिक्रमण निर्मूलन पथकावर सोपविण्यात आली आहे. आयुक्तांनी महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची घरे मोजणी करण्याचा निर्णय घेतल्याने कोणत्या अभियंत्याकडे किती संपत्ती, हे लवकरच स्पष्ट होईल. पहिल्या टप्प्यात सहायक संचालक नगररचना विभागातील अभियंत्याच्या घराची मोजणी करुन वस्तूनिष्ट अहवाल सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. घरमोजणीत चुकीची माहिती अहवालात सादर केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. असे स्पष्ट निर्देश आयुक्त गुडेवार यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)
इतवारा बाजारात अतिक्रमण हटविले
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने गुरुवारी २७ हातगाड्या जप्त करण्याची कारवाई केली आहे. या कारवाईने हॉकर्स व्यावसायिकांमध्ये प्रशासनाप्रती रोष व्यक्त करण्यात आला आहे. आयुक्त गुडेवार यांच्या निर्देशानुसार सुरु असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या श्रृंखलेत स्थानिक इतवारा बाजार ते गांधी चौक या दरम्यान रस्त्यालगत लागणाऱ्या हातगाड्या सकाळीच हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे. तसेच गाडगेनगर परिसरातही हातगाड्या जप्त करण्यात आला आहे. एकीकडे हॉकर्स झोन निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु असताना अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून होणाऱ्या कारवाईने हॉकर्स त्रस्त झाले आहेत. या कारवाईत अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे, उमेश सवाई, पोलीस उपनिरिक्षक खराटे व त्यांची चमू हजर होती.
ज्या अभियंत्यानी नागरिकांना प्रचंड त्रास दिला. वारंवार पायऱ्या झिजवून दखल घेतली नाही, अशा अभियंत्यांचे घर मोजणी करण्याचे निर्देश दिले आहेत. स्वत:चे घर पाडले तर काय वेदना होतात, हे मोजणीनंतर अभियंत्यांना जाणवेल.
- चंद्रकांत गुडेवार,
आयुक्त, महापालिका.