लॉकडाऊन कालावतीच यू-डायसची माहिती भरण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:12 IST2021-04-25T04:12:06+5:302021-04-25T04:12:06+5:30
अमरावती : शाळांनी यू-डायस संदर्भातील माहिती येत्या २६ एप्रिलपर्यंत भरण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. कोरोनाचा वाढता ...

लॉकडाऊन कालावतीच यू-डायसची माहिती भरण्याचे आदेश
अमरावती : शाळांनी यू-डायस संदर्भातील माहिती येत्या २६ एप्रिलपर्यंत भरण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, सर्वत्र कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने माहिती भरण्यासाठी शाळांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी शिक्षण आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.
समग्र शिक्षा या योजनेचे पुढील वर्षाचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्याकरिता यू-डायस प्लस प्रणालीमार्फत संगणकीकृत होणाऱ्या माहितीचा उपयोग होणार असून, याच माहितीच्या आधारे केंद्राकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांना अनुदान मंजुरी दिली जाते. केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या या ऑनलाईन प्रणालीमध्ये राज्यातील सर्व शाळांची माहिती राज्य, जिल्हा, महानगरपालिका व तालुका तसेच शाळास्तरावरून ऑनलाईन पद्धतीने ३१ मे २०२१ पर्यत माहिती संगणकीकृत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. मात्र, शिक्षणाधिकाऱ्यांनी २६ एप्रिल ही मुदत दिली. परिणामी मुख्याध्यापक व शिक्षक संभ्रमात आहेत. त्यातच सार्वजनिक वाहतूक केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच खुली असल्याने शाळेत कसे पोहोचावे, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. याकरिता मुदतवाढ दिली जावी, अशी मागणी होत आहे.
यू-डायस प्लस प्रणालीचा उपयोग
यू-डायस प्लस प्रणालीमधील माहितीचा उपयोग वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक तयार करणे तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ ची अंमलबजावणी तसेच राज्याचा शैक्षणिक निर्देशांक देशपातळीवर निश्चित करण्याकरिता होतो.