सोलर उपकरण गैरव्यहार चौकशीचे विभागीय आयुक्तांचे आदेश
By Admin | Updated: December 31, 2014 23:17 IST2014-12-31T23:17:24+5:302014-12-31T23:17:24+5:30
मेळघाटात जी रेंज सोलर एनर्जी 'मेडा' या नावाने बनावट कंपनीने आरसी दाखवून सोलर उपकरणे विकल्याच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ

सोलर उपकरण गैरव्यहार चौकशीचे विभागीय आयुक्तांचे आदेश
अमरावती : मेळघाटात जी रेंज सोलर एनर्जी 'मेडा' या नावाने बनावट कंपनीने आरसी दाखवून सोलर उपकरणे विकल्याच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ यांनी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्याकडे लेखी पत्राव्दारे केली आहे. खासदारांच्या पत्राची दखल घेत विभागीय आयुक्तांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत विभागीय आयुक्तांचे लेखी पत्र जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांना प्राप्त झाले आहेत.
मेळघाटात जी रेन्ज सोलर एनर्जी या नावाने चांदूररेल्वे येथील दोन व्यक्तींनी ‘मेडा’ (एमईडीए)ची अधिकृत मान्यता न घेता बोगसरीत्या तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसह एकूण १०० ग्रामपंचायतींच्या सचिवांशी संगनमत करून शासनाच्या १३ व्या वित्त आयोगाच्या निधीचा दुरूपयोग केला.
२ कोटी रूपयांचा सोलर लॅम्प घोटाळा केल्याची तक्रार धारणी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसह जि.प. सीईओ व विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खासदार अडसूळ यांच्याकडेही तक्रारी आल्यामुळे त्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे पत्र विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार ही चौकशी जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी जालींदर आभाळे यांनी धारणीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपविली आहे. या चौकशीत आता ‘एमईडीए’ची अधिकृत आरसी मान्यता न घेता बोगसरीत्या २०१२ मध्ये जी. रेन्ज सोलर एनर्जी नावाने कंपनी उघडून सोलर लॅम्पसाठी लागणाऱ्या सुट्या भागांची खरेदी केली. हे भाग धारणी तालुक्यातील झिल्पी, शिरपूर, राणी तंबोली, बिजुधावडी, मोगर्दा, भोकरबर्डी, चटवाबोड, जामपाटी, बिरोटी, सावलीखेडा, हिराबंबई, गोलई, दादरा, चाकर्दा, दुनी, कारदा, खापरखेडा, बेरदाबल्डा, राणामालूर, राजपूर, बोबदो या ग्रा.पं. मध्ये बनावट कंपनीने सोलर लाईट पुरवून गैरव्यवहार केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहे. (प्रतिनिधी)