कृषी विभागातील वादग्रस्त बदलीच्या चौकशीचे आदेश
By Admin | Updated: July 22, 2014 23:48 IST2014-07-22T23:48:07+5:302014-07-22T23:48:07+5:30
विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत वादग्रस्त ठरलेल्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कृषी मंत्रालयाने दिले आहेत. येत्या आठवडाभरात चौकशी

कृषी विभागातील वादग्रस्त बदलीच्या चौकशीचे आदेश
अमरावती : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत वादग्रस्त ठरलेल्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कृषी मंत्रालयाने दिले आहेत. येत्या आठवडाभरात चौकशी समिती या प्रकरणाचा अंतिम अहवाल शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती आहे. या चौकशीत प्रशासन अधिकारी शिरसाठ यांची सावध भूमिका राहणार असून बदल्या करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यमुक्त बदली आदेशावर सहाय्यक प्रशासन अधिकारी देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या असल्याने त्यांना या चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याची कृषी विभागात चर्चा आहे.
विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून राबविण्यात आलेल्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रकरणाचे लागेबांधे थेट कृषी मंत्रालयापर्यंत जोडल्या गेले आहेत. बदलीसाठी घेण्यात आलेल्या निधी खालपासून वरिष्ठ पातळीपर्यंत जात असल्याचीही चर्चा आहे. यापूर्वी कृषी विभागातील नोकर भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरली त्यामुळे कृषी विभाग चांगलाच बदनाम झाला आहे. कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत मागील काही दिवसापूर्वी विभागातील ५०५ कृषी सहायक, ११ पर्यवेक्षक, ८ सहायक, ११ वरिष्ठ लिपीक, १८ कनिष्ठ लिपीक, अनुरेखक १० व दोन वाहन चालकांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्या करताना मोठा आर्थिक व्यवहार झाल्यामुळे बदली प्रक्रियेत सर्व नियम धाब्यावर बसवून या बदल्या करण्यात आल्याची ओरड याच विभागातील कर्मचाऱ्यांनी सुरू केली. दरम्यान, याबाबतची तक्रार थेट मंत्रालयापर्यंत पोहचताच अमरावती विभागातील कृषी कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेची चौकशी सुरू झाली असून या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होताच कारवाई होईल.