केशरी गालिचाला पिवळ्याचे कोंदण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:12 IST2021-03-07T04:12:38+5:302021-03-07T04:12:38+5:30
पोहरा बंदी : निसर्गसौंदर्याने नटलेल्या डोंगरदरीच्या पोहरा-चिरोडी जंगलात निसर्गाची अफलातून जादू पाहावयास मिळते. या जंगलात पळसाची झाडे मोठ्या संख्येने ...

केशरी गालिचाला पिवळ्याचे कोंदण
पोहरा बंदी : निसर्गसौंदर्याने नटलेल्या डोंगरदरीच्या पोहरा-चिरोडी जंगलात निसर्गाची अफलातून जादू पाहावयास मिळते. या जंगलात पळसाची झाडे मोठ्या संख्येने असून, त्यावर केवळ केशरी फुले दृष्टीस पडत आहेत. मात्र, या झाडांच्या मध्ये एकमेव पिवळ्या रंगाची फुले असलेले पळसाचे झाड वेगळे अस्तित्व सिद्ध करू पाहत आहे. निसर्गप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरली आहे.
पोहरा, चिरोडी वनक्षेत्रात सध्या पळसाची पाने गळून त्यावर केशरी रंगाची फुले महाशिवरात्री, होळी, रंगपंचमीची चाहूल देऊन जातात. याच केशरी रंगाच्या गालिच्यात मध्यभागी असलेल्या टेकडीवर पिवळ्या पळसाचे एकमेव झाड मुकुटमणी ठरले आहे. डोंगराच्या चहुबाजूंनी निसर्गाने पळसाचा केशरी रंग दिला असताना, त्यात २० ते २५ फूट उंच अगदी छोट्या गोलाईचे एकमेव पिवळ्या फुलांच्या पळसाचे झाड सर्वांचे आकर्षण ठरले आहे. पानगळतीमुळे बोडखे झालेल्या या पळसाच्या झाडाच्या शेंडावरील पिवळ्या रंगाचा पुष्पगुच्छ आकर्षित करून घेतो. पोहरा जंगलातील अशा प्रकारचे हे एकमेव पिवळ्या फुलांचे झाड असून, याची नोंद वनविभागाने घेतली आहे.