वाढत्या तापमानामुळे संत्रा फळांना गळती
By Admin | Updated: May 8, 2015 00:27 IST2015-05-08T00:27:44+5:302015-05-08T00:27:44+5:30
विदर्भाच्या कॅलिफोर्नियात सूर्य आग ओकू लागल्याने संत्राबागा होरपळत आहेत. अतितापमानामुळे संत्र्याच्या आंबिया बहराला गळती लागल्याने संत्रा उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.

वाढत्या तापमानामुळे संत्रा फळांना गळती
संजय खासबागे वरूड
विदर्भाच्या कॅलिफोर्नियात सूर्य आग ओकू लागल्याने संत्राबागा होरपळत आहेत. अतितापमानामुळे संत्र्याच्या आंबिया बहराला गळती लागल्याने संत्रा उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. तीन वर्षांपासूनच्या सतच्या नापिकीमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांकडे खरिपाच्या मशागतीकरिता आर्थिक तरतूद नसल्याने शेकडो हेक्टर जमीन पडीक राहण्याची शक्यता आहे. शासनाने तातडीने पीककर्ज द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
तालुक्यात १६ हजार हेक्टरमध्ये संत्र्याचे पीक आहे. सद्यस्थितीत तापमान ४४ ते ४५ डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे संत्र्याचा आंबिया बहर गळत आहे. गळतीचे प्रमाण ४० ते ५० टक्के असल्याने संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक शेतकऱ्यांनी त्यांची शेतजमीन विकली तर अनेकांची सावकारांच्या घशात गेली आहे. शेतजमिनी, मालमत्ता विक्रीपत्र, इसारचिठ्ठीसारख्या कागदपत्रांचा आधार घेऊन शेतकऱ्यांनी गहाणात मालमत्ता ठेवली आहे भूमाफियांनी त्या जमिनी हडपल्या आहेत.
आता वाढत्या तापामानाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले. अशा परिस्थीतीत शेतकऱ्यांनी जगावे की मरावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे विवाह सोहळे स्थगित होत आहेत. अनेकांना पोटाची खळगी भरण्याकरिता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
खरीप हंगामाकरिता बी- बियाणे, खते तसेच शेतीच्या मशागतीवर हजारो रुपये खर्च करावा लागतो. परंतु पैसाच नसल्याने अद्याप शेतीची मशागत सुरू झालेली नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेकडो हेक्टर जमीन पडीक राहण्याची चिन्हे दिसत आहे.
त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तातडीने बियाणे, अनुदानावर खतांचा पुरवठा करावा तर मशागतीकरिता पीककर्जाचे मे महिन्यातच वाटप करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.