देशाच्या प्रमुख शहरांसाठी अमरावतीतून संत्रा निर्यात
By Admin | Updated: October 24, 2015 00:13 IST2015-10-24T00:13:31+5:302015-10-24T00:13:31+5:30
यावर्षी कमी पाऊस झाल्याने गत ७ वर्षांच्या तुलनेत आंबिया बहराचे उत्पादन सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी वाढले आहे.

देशाच्या प्रमुख शहरांसाठी अमरावतीतून संत्रा निर्यात
अमोल कोहळे अमरावती
यावर्षी कमी पाऊस झाल्याने गत ७ वर्षांच्या तुलनेत आंबिया बहराचे उत्पादन सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी वाढले आहे. नेहमीपेक्षा यावेळी आंबिया बहराच्या संत्र्याला परप्रांतात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने अमरावतीतून देशाच्या प्रमुख शहरासाठी संत्रा निर्यात केला जात आहे.
अवीट गोडी व चवीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नागपुरी संत्र्याची मागणी देश-विदेशात वाढली आहे. राज्यातील एकूण संत्रा उत्पादनापैकी ६५ टक्के संत्रा उत्पादन अमरावती व नागपूर जिल्ह्यात घेतले जाते. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ६५ हजार क्षेत्रात उत्पादन क्षम संत्रा बागा आहेत. दिवसेंदिवस पाण्याअभावी संत्रापट्टा कमी होत असला तरी यावर्षीच्या अधिक पावसाने संत्रा उत्पादकांना काहीसा दिलासा दिला आहे. गत ७ वर्षांच्या तुलनेत यावेळी आंबिया बहराच्या उत्पादनात २५ टक्क्याच्यावर वाढ झाली आहे. एरवी आंबिया बहराची संत्री खरेदी करण्यास उत्सुक न राहणारे व्यापारी आंबिया बहराच्या संत्रा खरेदी करण्याच्या उद्देशाने अमरावतीत ठाण मांडून बसले आहेत. शहरात सध्या स्थानिक व इतर राज्यातील लहानमोठे दोनशे व्यापारी आहेत. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार, मोर्शी, वरूड, करजगाव, अंजनगाव, धामणगाव चांदूररेल्वे व लगतच्या जिल्ह्यातून संत्रा खरेदी करून हा संत्रा पणजी, इंदौर, दिल्ली, मुंबई, तिरुअनंतपुरम, सुरत, अहमदाबाद, पूणे, सोलापूर, चेन्नई व कोलकता इत्यादी बड्या शहरात संत्री विक्रीकरिता पाठवीत आहे. ७ वर्षांच्या तुलनेत यंदा आंबिया बहराची उत्पादनात सुमारे २५ ते ३० टक्के वाढ झाल्याने अमरावतीतून दरदिवशी सुमारे ६० ट्रक संत्री परप्रांतात निर्यात केली जात आहे. परप्रांतातील संत्रा निर्यात वाढल्याने ट्रक वाहतूकदारांनी भाड्यात मोठी वाढ केली आहे. अमरावतीतून परप्रांतात संत्रा घेऊन जाणारे ट्रक २० ते २५ हजार रूपये भाडे आकारात आहेत. संत्रा कॅरेटच्या भावातसुद्धा कमालीची वाढ झाली आहे. तनसचे भाव वाढले आहे. मुंबई, दिल्ली व पुणे इत्यादी मोठ्या शहरात नागपुरी संत्र्याला मोठी मागणी आहे. यावर्षी भाव कमी आहे, असे एका संत्रा व्यापाऱ्याने सांगितले. आंबियाची संत्री मृग बहराच्या भावात खप असली तरी याचा फायदा निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना मिळत आहे. अमरावतीतून मोठ्या प्रमाणात संत्रा निर्यात होत असतानासुद्धा शीतगृह, ग्रेडींग, पॅकिंग हाऊस पिकू लिग, रेफ्रीजिरेटेड कंटनेरे इत्यादी सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. या सुविधा उपलब्ध झाल्यास देशातील मोठी संत्रा बाजारपेठ येथे तयार होऊ शकेल.