संत्रा उत्पादकांना बसणार २०० कोटींचा फटका
By Admin | Updated: October 6, 2014 23:04 IST2014-10-06T23:04:37+5:302014-10-06T23:04:37+5:30
तालुक्यात जवळ-जवळ ४०० कोटींचा व्यवसाय आंबिया बहाराचा होतो. मात्र यंदा येथील संत्र्याचा व्यापार २०० कोटी रुपयापर्यंत तरी होईल की नाही, याबाबत संत्रा उत्पादकांसह व्यापारी देखील साशंक आहेत.

संत्रा उत्पादकांना बसणार २०० कोटींचा फटका
सुरेश सवळे - चांदूरबाजार
तालुक्यात जवळ-जवळ ४०० कोटींचा व्यवसाय आंबिया बहाराचा होतो. मात्र यंदा येथील संत्र्याचा व्यापार २०० कोटी रुपयापर्यंत तरी होईल की नाही, याबाबत संत्रा उत्पादकांसह व्यापारी देखील साशंक आहेत.
तालुक्यातील घाटलाडकी, शिरजगाव कसबा, देऊरवाडा, ब्राम्हणवाडा, वणी, विश्रोळी, देऊरवाडा, माधान आदी अनेक गावांमध्ये संत्रा उत्पादक दरवर्षी संत्रा उत्पादनातून लाखो रुपयांची उलाढाल करतात. पण, यंदा अनियमित पावसामुळे व मध्यंतरी बसलेल्या पूर्णा नदीच्या पुराच्या तडाख्याने संत्र्याची नवीन लावलेली झाडे वाहून गेली. तर नदी काठच्या बागांना या अतिरिक्त पाण्याच्या प्रवाहाचा मोठा फटका बसला. सततच्या पावसानंतर वाढलेल्या तापमानामुळे जमिनीतील वाफेमुळे मोठ्या प्रमाणात संत्र्याची फळे गळत आहेत. आता झाडांवर उरलेल्या संत्र्यांची वाढ खुंटली असून या लहान संत्रा फळांना बाजारपेठेत भाव नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.
१२०० ते १५०० रुपये अल्प दराने ही संत्री विकावी लागत आहेत. पूर्ण वाढ झालेल्या फळाला असून २ हजार ते २२०० रुपये दर मिळतो. मात्र, यंदा हा भाव मिळणार नाही, असे मत येथील संत्रा व्यापारी व्यक्त करीत आहेत. येथील बाजारपेठेतील संत्री केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गोवा सारख्या राज्यात तर जातातच; शिवाय येथील दर्जेदार संत्री परदेशातसुुध्दा जातात. सर्व राज्यातून व्यापारी या ठिकाणी व्यापार करण्यासाठी येतात. मात्र, एरवी ५ आॅक्टोबरपर्यंत मोठ्या प्रमाणात संत्र्यांची उलाढाल होत होती. ती परिस्थिती यंदा दिसत नाही.
अशातच आंबिया बहाराचेही संत्रा उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागण्याचे चित्र दिसून येत आहे. एरवी ४०० कोटींची होणारी संत्र्याची उलाढाल यावेळी २०० कोटींच्या आतच आटोपते की काय, अशी स्थिती आहे. त्यामुळे फळगळतीमुळे तालुक्यातील संत्रा उत्पादकांना २०० कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. एकूणच चांदूरबाजार तालुक्यातील संत्रा उत्पादकांना भविष्यात मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे.