दलालांनी कवडीमोल भावाने खरेदी केला संत्रा
By Admin | Updated: February 26, 2015 00:11 IST2015-02-26T00:11:38+5:302015-02-26T00:11:38+5:30
उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या मृग संत्र्याचे सद्यस्थितीत दर अठ्ठावीस हजार रुपये टन असे भाव आहेत.

दलालांनी कवडीमोल भावाने खरेदी केला संत्रा
लोकमत विशेष
सुदेश मोरे अंजनगांव सुर्जी
उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या मृग संत्र्याचे सद्यस्थितीत दर अठ्ठावीस हजार रुपये टन असे भाव आहेत. याआधी विकला गेलेला आंबिया बहार संत्रा मात्र उत्पादक शेतकऱ्यांची दलालांनी कोंडी करुन दहा हजार रुपयांच्या आत विकण्यास त्यांना बाध्य केले. कोणत्याही परिस्थितीत दहा हजारांपेक्षा अधिक भाव मिळू नये यासाठी व्यापाऱ्यांच्या भेटी शेतकऱ्यांशी होऊ दिल्या नाहीत. हाच संत्रा शहरात किरकोळ विक्रीसाठी ४० रुपये किलो आणि मॉलमध्ये ६० रुपये किलो विकला गेला. शेतकऱ्यांना लुटून दलालांनी आंबिया बहरात मोठा नफा कमविला.
संत्रा उत्पादकांच्या बागा मोठ्या प्रमाणात असलेल्या या परिसरात शीतगृह निर्मिती व बँकेची संत्रा फळासाठी तारण योजना जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत दलालीच्या या समस्यांवर कोणताही उपाय नाही. फळ बागायतदारांचे बचत गट स्थापन करुन व्यवस्थापन आणि संत्रा ज्युस व फळविक्री केंद्र आदी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
शीतगृह निर्मितीचा प्रयोग प्रत्यक्षरीत्या अमलात आणण्यासाठी व त्याची दैनंदिन देखभाल करण्यासाठी अत्यंत खर्चिक असल्यामुळे या क्षेत्रात बाजार समित्या धजावत नाहीत. नेमका याचाच फायदा घेऊन भाव पाडणे व एकत्र येऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी करणे हा दलालांचा नेहमीचा फंडा आहे.
ज्यांना शेती कसण्याबाबत कोणत्याही प्रकारचे ज्ञान नाही तेच लोक शेतकऱ्यांच्या मेहनतीवर डाका टाकून नफा कमावण्याचा प्रयत्न करीत असतात.
विदर्भातील संत्राबागांचे विक्री व्यवस्थापनाकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. नव्या शासनाने यामध्ये लक्ष घालून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची संघटना स्थापन करणे, विक्रीचे थेट ग्राहकापर्यंत नेटवर्क स्थापन करणे, हुंडी मध्ये संत्रा खरेदीवर बंदी आणून मेट्रिक टन पध्दतीने खरेदीचे बंधन घालणे, संत्रा प्रक्रिया केंद्र स्थापन करणे, आदी उपाययोजनांची नव्या शासनाकडून अपेक्षित आहे.
व्यापाऱ्यांना संत्रा विकून दलालांनी शेतकऱ्यांना लावला चुना
पाचशे संत्रा झाडे असलेल्या बागेतील आंबिया बहराची फक्त सात हजार रुपये टनाने यावर्षी खरेदी झाली. पस्तीस टन माल निघालेल्या या बागेचे शेतकऱ्याला फक्त अडीच लाख रुपये मिळाले. हाच संत्रा दलालांनी मोठ्या व्यापाऱ्यांना अठरा हजार रुपये टनाने विकला. आणि पावणे चार चाख रुपये नफा कमाविला. बाजार ग्राहकांना हाच माल चाळीस रुपये किलोने विकून व्यापाऱ्यांनी साडेअकरा लाख रुपयांचा नफा मिळविला.