महापालिकेतील #MeeToo दडपविण्याचा खटाटोप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:44 IST2018-10-22T22:43:32+5:302018-10-22T22:44:56+5:30
महापालिकेतील वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने डॉक्टरविरुद्ध दिलेली मानसिक छळवणुकीची तक्रार दडपविण्याचा वृथा खटाटोप काहींनी चालविला आहे. चौकशीची ब्याद नको म्हणून तडजोडीसाठी विशाखा समितीमधील काहींनीच तक्रारकर्त्या महिला अधिकाऱ्याची समजूत काढण्याचा प्रयत्न चालविल्याची खात्रीलायक माहिती आहे.

महापालिकेतील #MeeToo दडपविण्याचा खटाटोप !
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेतील वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने डॉक्टरविरुद्ध दिलेली मानसिक छळवणुकीची तक्रार दडपविण्याचा वृथा खटाटोप काहींनी चालविला आहे. चौकशीची ब्याद नको म्हणून तडजोडीसाठी विशाखा समितीमधील काहींनीच तक्रारकर्त्या महिला अधिकाऱ्याची समजूत काढण्याचा प्रयत्न चालविल्याची खात्रीलायक माहिती आहे. महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्याकडेही या महिलेने याबाबतची तक्रार केली आहे. सध्या देशभरात ‘मी टू’चे वादळ उठले असताना, डॉक्टरवर झालेल्या या आरोपांमुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
महापालिकेतील तत्कालीन कंत्राटी शहर अभियंता जीवन सदार यांच्याविरोधातील एका महिला कर्मचाऱ्याची तक्रार निर्णयाविना फाईलबंद करण्यात आली होती. त्याचअनुषंगाने ही तक्रार सामंजस्याने सोडविण्याबाबत विशाखाचे काही सदस्य आग्रही असल्याची माहिती समितीतील सदस्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली. सदार यांच्याविरोधातील तक्रारीची नव्याने चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन आयुक्त हेमंत पवार यांनी दिले होते. मात्र, सदार यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतरही ती चौकशी अंतिम टप्प्यापर्यंत पोहचलेली नाही. त्यापार्श्वभूमिवर ही तक्रार मागे घ्यावी, आरोपी डॉक्टरने महापालिकेबाहेर त्यातून सन्मान्य तोडगा काढावा, असा सल्ला दिल्याची माहिती हाती आली आहे.
२८ सप्टेंबरला महापालिकेतील एका डॉक्टरने आपल्याशी वाद घातला. त्या वादाचे व्हिडिओ रेकॉडिंग केले. तत्पूर्वी २७ सप्टेंबर रोजी याच डॉक्टरने नगरसेविकेसह आपलाही अपमान केला. २० वर्षांपेक्षा कनिष्ठ डॉक्टरने केलेली ती कृती प्रचंड अपमानजनक असून त्या डॉक्टरला कठोर शासन करावे, अशी तक्रार एका वरिष्ट अधिकारी महिलेने आयुक्तांकडे केली. त्यानंतर ४ आॅक्टोबरला ती तक्रार विशाखा समितीकडे प्राप्त झाली. ४ आॅक्टोबर रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तब्बल १३ दिवसाने अर्थात १७ आॅक्टोबर रोजी विशाखा समितीची बैठक झाली. त्यात मानसिक छळवणुकीचा आरोप असलेल्या डॉक्टरला सुनावणीसाठी बोलावण्यात आले.बैठकीतील माहितीनुसार, त्या डॉक्टरला समज देऊन आणि माफी मागून प्रकरण संपविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे आता तक्रारकर्ती महिला अधिकारी नेमका काय पवित्रा घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तक्रार मागे घेण्यासाठी ‘चार्ज’
महापालिका आस्थापनेवरील डॉक्टरविरुद्ध तक्रार करणाºया त्या महिला अधिकाऱ्याकडून एका महत्त्वाच्या पदाचा प्रभार काढून अन्य व्यक्तीकडे देण्यात आला होता. रजेहून परतल्यानंतर तो प्रभार त्यांना देण्यात आला नाही. मात्र, त्या व्यक्तीविरोधात विशाखाकडे तक्रार दिल्याबरोबर थेट आयुक्तांनीच त्या महिला आधिकाऱ्याला प्रभार बहाल केला. त्यातून तक्रारीचे गांभीर्य कमी करण्यात प्रशासन आणि विशाखा समितीला यश आल्याचा सूर महापालिकेत उमटला आहे.