चांदूर बाजार समितीच्या मतदानाच्या दिवसावर आक्षेप
By Admin | Updated: July 22, 2015 00:46 IST2015-07-22T00:46:15+5:302015-07-22T00:46:15+5:30
येत्या १३ सप्टेंबरला होऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे.

चांदूर बाजार समितीच्या मतदानाच्या दिवसावर आक्षेप
पोळ्याच्या करीला मतदान : १५६९ मतदार निवडणार १८ संचालक
सुरेश सवळे चांदूरबाजार
येत्या १३ सप्टेंबरला होऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. इच्छुकांनी उमेदवारी अर्जासाठी ‘फिल्डिंग’ लावणे सुरू केले आहे. काहींना आपल्या उमेदवारीची शाश्वती आहे तर काही आपल्या नेत्यांच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत.
बाजार समितीच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर होताच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाची तारीख १३ सप्टेंबर निश्चित केली आहे. या तारखेला ‘पोळ्याची कर’ येत असल्यामुळे व हा सण शेतकऱ्यांशी निगडित असल्यामुळे याचा मतदानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बाजार समितीचे माजी सभापती मंगेश देशमुख यांनी वर्तविली आहे. त्यामुळे ही तारीख बदलविण्याची मागणी त्यांनी स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याकडे केली आहे. बाजार समितीच्या या निवडणुकीला ना आचारसंहितेचे बंधन, ना खर्चाची मर्यादा हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. या बाजार समितीच्या निवडणुकीत १५६९ मतदार आपला हक्क बजावून १८ संचालक निवडणार आहेत. दरम्यान मतदानाच्या दिवसावर आक्षेप घेण्यात आल्यामुळे मतदानाची तारीख एक दिवसाने वाढण्याची शक्यता असून तसे शुध्दीपत्रक जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडून काढले जाणार असल्याची माहिती आहे. बाजार समितीची निवडणूक कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम १९६३ नियम १९६७ नुसार घेण्यात येते. सहकार कायद्याचे नियम यास लागू होत नाहीत. सहकार क्षेत्रातील वावरणारे दिग्गज नेते या निवडणुकीत सहभागी होत असले तरी बाजार समितीचे नियम व निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे या निवडणुकीला आचारसंहिता व खर्चाचे बंधन लागू होत नाहीत. त्यामुळे धनदांडग््या व वजनदार व्यक्तींना ही निवडणूक खूपच सोपी असते. सहकारी संस्थांच्या निवडणुुका सहकार कायद्यानुसार होतात. त्याकरिता सहकार आयुक्त व त्यांच्या निर्देशानुसार निवडणुका घेणे सहकारी संस्थांना बंधनकारक असतात. त्यांना निवडणूक आयोगाच्या नियमावलीचे बंधन असते. परंतु बाजार समित्या या समिती कायद्याखाली पंजीबध्द असल्याने या निवडणुकांना निवडणूक आयोगाची आचारसंहिता लागू होत नाही. त्यामुळे खर्चाचे विवरण देणे हेदेखील उमेदवारांना बंधनकारक राहत नाही.
सहकार क्षेत्रातील कोणत्याही संस्थांना उलाढालीपेक्षा बाजार समित्यांचा लेखा-जोखा मोठा असतो. त्यामुळे समिती निवडणुकरिता नेत्यांना अधिक आकर्षण असते. साहजिकच या निवडणुका साधारण वातावरणात होऊ शकतच नाहीत. आचारसंहिता व खर्चाची बाब सोडली तर निवडणुकांतील नियमाप्रमाणे सर्वच घरतील उमेदवार संचालक पदाकरिता निवडणूक लढवू शकतात.
१९६९ मतदार निवडणार १८ संचालक
सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून ११ संचालक निवडून द्यायचे आहे. त्यात सर्वसाधारण ७, महिला २, ओबीसी १, विमुक्त भटक्या जाती, जमाती १ यात एकूण ५३८ मतदार आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघातून सर्वसाधारण २, अनुसूचित जमाती १, आर्थिक दृष्ट्या दुर्बल १ असे चार उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी या मतदारसंघातील ५८१ मतदारांवर असणार आहे. २६० मतदार व्यापारी-अडते मतदारसंघातून दोन संचालक तर १९० मतदार हमाल-मापारी मतदारसंघातून १ संचालक निवडणार आहेत. जसापूर ग्रामपंचायत चांदूरबाजार पंचायत समितीमधून प्रत्येकी एक स्वीकृत संचालक असतो.
कृषी उत्पन्न बाजार समिती ही कायद्यानुसार पंजीबध्द असते. त्यामुळे अधिनियम १९६३ नियम १९६७ नुसार समितीच्या निवडणुका घेणे बंधनकारक असते. यात आचारसंहिता व खर्चाचे विवरण देणे उमेदवारांना बंधनकारक नसते. पोळ्याच्या करीच्या दिवशी होणाऱ्या मतदानाच्या तारखेवर आक्षेप घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली आहे. त्यांच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- अनिरुध्द राऊ त, निवडणूक निर्णय अधिकारी, बाजार समिती चांदूरबाजार.