ट्रॅक्टर उलटला, दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2017 00:09 IST2017-05-05T00:09:31+5:302017-05-05T00:09:31+5:30

नजीकच्या धारणमहू व उकूपाटी गावाच्या मध्यभागी महादेव नाल्यात ट्रॅक्टर उलटून त्याखाली दबून मामा व भाच्याचा जागीच मृत्यू झाला.

The opposite of the tractor, the two killed | ट्रॅक्टर उलटला, दोन ठार

ट्रॅक्टर उलटला, दोन ठार

उकुपाटी येथील घटना : मृतांमध्ये मामा-भाच्याचा समावेश
धारणी : नजीकच्या धारणमहू व उकूपाटी गावाच्या मध्यभागी महादेव नाल्यात ट्रॅक्टर उलटून त्याखाली दबून मामा व भाच्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री २ वाजता घडली असावी, असा कयास व्यक्त केला जात आहे. मामा-भाचे भाड्याने घेतलेले शेत नांगरत असताना ही घटना घडली.
ट्रॅक्टर रिव्हर्स घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. ट्रॅक्टरखाली दबल्याने दोघांना चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. सचिन भुरेलाल सेमलकर (१९, रा.चाकर्दा) व रमेश सोमा धांडे (४५, रा.उकूपाटी) अशी मृतांची नावे आहे. ट्रॅक्टर मालक सचिन सेमलकर हा रमेश धांडे यांच्यासमवेत रात्री २ वाजता रमेश यांनी घेतलेले भाड्याचे शेत नांगरण्याचे काम करीत होता. हे शेत राणामालूर येथील शेतकऱ्याचे आहे. याशेताच्या अगदी धुऱ्यावर नाला असून हा नाला १० फूट खोल आहे. धुऱ्यावर ट्रॅक्टर रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न करीत असताना हा अपघात घडला.
पहाटे परिसरातील लोकांना हा अपघात दिसून आला. घटनेची माहिती पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली. परिसरातील धारणमहू, उकूपाटी, दिया आदी गावातील शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. ट्रॅक्टरखाली दबलेले दोन्ही मृतदेह नागरिकांनी महत्प्रयासाने बाहेर काढले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच धारणीचे ठाणेदार गवई यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात दाखल केले. यावेळी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्यासह कालू मालवीय, अनिल मालवीय, प्रमोद खरपे, विष्णू पटोरकर उपस्थित होते. घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. ट्रॅक्टरच्या दुर्देवी अपघातात मामा-भाचाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. रात्री हा अपघात घडल्याने अपघातग्रस्तांना कोणतीही मदत मिळू शकली नाही. परिणामी उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The opposite of the tractor, the two killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.