मनीष तसरे लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे आठवड्याभरात २० पक्ष्यांचा मृत्यू झाला. कठोरा रोडवरील नारायणनगर येथे राहणाऱ्या पक्षीप्रेमी दिलीप नंदागवळी यांच्या घरासमोरील हायव्होल्टेज ट्रान्सफॉर्मरच्या कनेक्शन बॉक्सला झाकण नसल्यामुळे मैना तिथे घरटे बनविण्याकरिता जातात व विद्युत शॉक लागून त्या मरण पावतात. ही बाब लक्षात आल्यावर महावितरणला त्यांनी ऑनलाइन तक्रार केली. तक्रार केल्या केल्याच त्यांना तक्रारीचे निरसन झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाइलवर मिळाला. तक्रारीचे निरसन मात्र झाले नाही. दररोज तेथे दोन ते तीन मैना शॉक लागून मरतात.
झाकणच बसविले नाहीनारायणनगर ते कठोरा रोडवारील या हायव्होल्टेज ट्रॉन्सफॉर्मरमध्ये चुकीच्या पद्धतीने तारा जोडण्यात आल्या. त्यामुळे त्याला झाकण बसविण्यात आले नाही. ते उंचीवर असल्याने तिथे कुणाचा हात जरी जात नसला तरी अशा ठिकाणी पक्षी मात्र जातात व ते शॉक लागून मरण पावतात, हे वास्तव आहे.
तर जबाबदारी तुम..........
- तक्रारींचे निरसन होत नसल्याने दिलीप नंदागवळी यांनी महावितरणला पत्र पाठविले. आपणास ट्रांसफॉर्मरला झाकण बसविता येत नसेल तर ते लावण्यासाठी मी स्वतःच चढतो. मात्र, मला काही झाल्यास त्याची जबाबदारी मात्र विद्युत विभागाची राहील, असे त्यांनी मेलद्वारे कळविले.
- नंदागवळी हे निवृत्त शिक्षक आहेत. त्यांना भूतदया आहे. त्यांच्या घरात सुद्धा त्यांनी पक्ष्यांकरिता घरटे तयार केले आहे. त्यांच्या अंगणात अनेक झाडे असल्याने त्यांच्याकडे नेहमीच पक्ष्यांचा चिवचिवाट असतो.